Join us

शेअर बाजार उघडताच घसरण, Sensex ८० अंकांनी घसरून ८२,३११ वर; 'या' स्टॉक्समध्ये विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 10:12 IST

शेअर बाजाराची सुरुवात आज घसरणीसह सुरुवात झाली. बाजार उघडताच तो रेड झोनमध्ये गेला. बीएसई सेन्सेक्स ८०.३४ अंकांनी घसरून ८२,३११.३८ वर आला.

शेअर बाजाराची सुरुवात आज घसरणीसह सुरुवात झाली. बाजार उघडताच तो रेड झोनमध्ये गेला. बीएसई सेन्सेक्स ८०.३४ अंकांनी घसरून ८२,३११.३८ वर आला. याउलट निफ्टी १४.०५ अंकांनी वधारला. निफ्टी २५,१२६.७० अंकांवर व्यवहार करत होता. सेन्सेक्समध्ये समाविष्ट शेअर्सवर नजर टाकली तर महिंद्रा, रिलायन्स आणि इटर्नल्समध्ये तेजी दिसून येत होती. तर मारुती, एल अँड टी, टायटन, एशियन पेंट्स आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

मंगळवारी शेअर बाजारातील चार दिवसांची तेजी थांबली. बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक ५३.४९ अंकांनी घसरून ८२,३९१.७२ वर बंद झाला. सेन्सेक्सच्या शेअर्सपैकी १४ शेअर्स घसरणीसह बंद झाले तर १५ मध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे एका शेअरमध्ये कोणताही बदल झाला नाही. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) ५० शेअर्सचा प्रमुख निर्देशांक निफ्टी केवळ १.०५ अंकांच्या वाढीसह २५,१०४.२५ वर बंद झाला. गेल्या चार ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी ५६० अंकांनी म्हणजेच २.२७ टक्क्यांनी वधारला, तर सेन्सेक्स १,७०७.७ अंकांनी म्हणजेच २.११ टक्क्यांनी वधारला आहे.

जागतिक बाजारपेठेत तेजी सुरूच

चीनसोबत व्यापार कराराच्या अपेक्षांमुळे अमेरिकन शेअर बाजारांना चालना मिळाली आहे. मंगळवारी अमेरिकन बाजार हिरव्या रंगात बंद झाले. डाऊ जोन्सनं १०० अंकांची वाढ नोंदवली, तर टेक शेअर्समुळे नॅस्डॅक निर्देशांक १२५ अंकांनी वाढला आणि दिवसाच्या सर्वोच्च पातळीजवळ बंद झाला. ही वाढ अमेरिका-चीन व्यापार कराराबद्दलच्या वाढत्या अपेक्षांचा परिणाम आहे.

दरम्यान, टॅरिफशी संबंधित एक मोठी अपडेट देखील समोर आली आहे. अमेरिकन कोर्टानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफ निर्णयाला मान्यता दिली आहे. कनिष्ठ न्यायालयानं या टॅरिफवर बंदी घातली होती, परंतु वरच्या कोर्टानं ट्रम्प यांचा निर्णय चालू ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे अमेरिकेच्या व्यापार धोरणात स्थिरता राखता येईल.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक