Join us

आजतर कारण काहीच नाही, तरीही शेअर बाजार १० लाख कोटींना बुडाला; ट्रम्प की विदेशी गुंतवणूकदार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:38 IST

stock market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापारी धोरणामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. शेअर बाजारात आज १००० अंकांनी कोसळला आहे.

stock market : भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सध्याच काळ कठीण आहे. गेल्या ३ महिन्यांपासून सातत्याने ते घसरणीचा सामना करत आहेत. आधीच वाईट स्थिती असताना डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यात आणखी भर पडली. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक आक्रमक निर्णय घेतले आहेत. त्याचा जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. ट्रम्प यांनी नुकतेच स्टील आणि ॲल्युमिनियमच्या आयातीवर २५ टक्के शुल्क लागू करण्याची घोषणा केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. दुपारी १:४१ वाजता सेन्सेक्स १,०३८ अंकांनी खाली होता. तर निफ्टी ३२७ अंकांनी घसरली. मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये ३.५ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली.

टॅरिफचा थेट भारतीय शेअर बाजारावर परिणामट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी कॅनडा, मॅक्सिको, रशिया आणि चीन यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्याचा परिणाम भारतासारख्या देशांनाही सहन करावा लागत आहे. नुकतेच ॲल्युमिनियम आणि स्टीलवरील शुल्क १० टक्क्यांवरून २५ टक्के करण्यात आले. जे ४ मार्चपासून लागू होईल. हे शुल्क कॅनडा आणि मेक्सिको सारख्या प्रमुख पुरवठादारांसह यूएसमध्ये सर्व स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर लागू होईल. या टॅरिफचा उद्देश चीन आणि रशियासारख्या काही देशांना धडा शिकवण्यासाठी लावण्यात आले आहे. यामुळे अमेरिकन उत्पादनाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा ट्रम्प यांचा दावा आहे.

ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतावर काय परिणाम?भारत अमेरिकेला अत्यंत कमी प्रमाणात स्टीलची निर्यात करतो. परंतु, ॲल्युमिनियमच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. भारत हा जगातील मोठा ॲल्युमिनियम उत्पादक देश असून अमेरिका त्याचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. या शुल्कामुळे भारताच्या ॲल्युमिनियम निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. वेदांत आणि हिंदाल्को सारख्या भारतीय कंपन्यांना कालांतराने नवीन बाजारपेठा मिळतील, पण तोपर्यंत त्यांना तोटा सहन करावा लागू शकतो, असे उद्योग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच ११ फेब्रुवारीला अमेरिकेच्या दौऱ्यावर जात असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.

परकीय गुंतवणूकदारांची पाठभारतीय शेअर बाजाराला लागलेलं आणखी एक ग्रहण म्हणजे परकीय गुंतवणूकदारांची विक्री. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या आकडेवारीनुसार, एफपीआयने जानेवारीमध्ये ७८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स विकले. त्याच वेळी, १० फेब्रुवारीपर्यंत एफपीआयने ७,३४२ कोटी रुपये काढून घेतले. जानेवारी २०२५ मध्ये, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी २३ पैकी २२ ट्रेडिंग सत्रांमध्ये विक्री केली. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. त्यात टॅरिफमुळे मेटल्स शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे.

रुपया घसरल्याने महागाई वाढणारशेअर बाजारातील घसरण थोडी होती की काय म्हणून रुपयाचीही घसरण सुरू आहे. ट्रम्प यांच्या आगमनानंतर डॉलर मजबूत होत आहे. तुलनेत रुपया ८७ रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेला. रुपयाचे अवमुल्यन झाल्याने आयात महाग होते. अशावेळी याचा थेट परिणाम महागाई वाढून सर्वसामान्यांवर होईल.      

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पशेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकअमेरिका