Join us

शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांना धक्का! निफ्टी २३,६०० च्या खाली, घसरणीमागे अमेरिका कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 10:06 IST

stock market crash : भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी वर्षाचा शेवटचा दिवस धक्कादायक ठरला. कारण, बाजार उघडताच मोठ्या प्रमाणात कोसळला.

stock market crash : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी या वर्षीचा शेवटचा दिवस चांगला ठरला नाही. २०२४ च्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी मंगळवारी भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. BSE सेन्सेक्स ४०४.३४ अंकांनी घसरला आणि ७७,८४३.८० अंकांवर उघडला. त्याचवेळी, एनएसई ८९.६० अंकांच्या घसरणीसह २३,५५४.८० अंकांवर व्यवहार करत आहे. सोमवारी जोरदार सुरुवात केल्यानंतर शेवटच्या ट्रेडिंग तासांमध्ये विक्रीचे वर्चस्व राहिले. आज बाजार उघडताच कोसळला. जर आपण निर्देशांकावर नजर टाकली तर आयटी, फार्मा, ऑटोसह सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये घसरण आहे. या घसणीमागची ५ कारणे समोर आली आहेत. बाजारातील घसरणीचे कारण काय?

  • अमेरिकन बाजारात भूकंप : भारतीय बाजारात मोठी घसरण होण्याचं मुख्य कारण अमेरिकन बाजार आहे. सोमवारी डाऊ जोन्स आणि नॅस्डॅकमध्ये मोठी घसरण झाली. त्याचा परिणाम आज भारतीय बाजारपेठेत दिसून येत आहे.
  • परकीय गुंतवणूकदारांकडून विक्री सुरुच : भारतीय बाजारातील घसरणीचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे परकीय गुंतवणूकदारांनी केलेली विक्री. परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सतत पैसे काढून घेत आहेत. त्यामुळे भारतीय बाजार सातत्याने विक्रमी पातळीवरून खाली जात आहे.
  • डॉलर मजबूत होणे : भारतीय बाजारातील घसरणीचे तिसरे मुख्य कारण म्हणजे डॉलरचे सतत मजबूत होत राहणे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमजोर होत आहे. रुपया प्रति डॉलर ८५ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. रुपया कमजोर झाल्याने विदेशी गुंतवणूकदारांचा नफा कमी होतो. त्यामुळे येथील पैसे काढून ते त्यांच्या घरच्या (डॉलर) चलनात रूपांतरित करतात, ज्यामुळे परकीय भांडवल बाहेर पडते आणि बाजारावर आणखी दबाव येतो. याचा परिणाम भारतीय बाजारावरही होत आहे.
  • कंपन्यांच्या स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत : भारतीय कंपन्यांचे पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले नाहीत. तिसऱ्या तिमाहीचे म्हणजे डिसेंबरचे आर्थिक निकालही फारसे चांगले येण्याची अपेक्षा नाही. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे.
  • मॅक्रो इकॉनॉमिक हेडविंड्स: भारताच्या ढासळत चाललेल्या मॅक्रो इकॉनॉमिक चित्राबाबत नवीन चिंता निर्माण झाल्या आहेत, ज्यामुळे बाजारातील भावनांवर परिणाम झाला आहे. नोव्हेंबरमध्ये देशाची व्यापार तूट सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. याशिवाय आर्थिक विकास दरही मंदावला आहे.
  • भारताचा दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर जवळपास दोन वर्षातील सर्वात कमी होता. सलग तिसऱ्या तिमाहीत विकास दरात घसरण झाली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. 
टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकनिर्देशांक