Closing Bell : डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफ लादण्याच्या घोषणेने भारतीय शेअर बाजारात निराशा पसरली. मंगळवारचे सत्र बाजारासाठी 'अमंगल' ठरले. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी बाजारात मोठी घसरण होऊन तो लाल निशाणीवर बंद झाला. आजचा दिवस सेन्सेक्सच्या मासिक एक्सपायरीचाही होता, ज्यात निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही सुमारे १% घसरणीसह बंद झाले. या घसरणीचा सर्वाधिक फटका मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सना बसला. निफ्टी बँक इंडेक्स सुमारे १.३% घसरून १५ मे २०२५ नंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर बंद झाला. एफएमसीजी इंडेक्स वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये विक्रीचा जोरदार दबाव दिसून आला.
रिअल्टी, डिफेन्स आणि पीएसई शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री झाली. तर मेटल, फार्मा आणि ऑइल अँड गॅस इंडेक्समध्ये १.५% पेक्षा जास्त घसरण झाली. अमेरिकेच्या संभाव्य टॅरिफमुळे बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले, ज्यामुळे बाजारात सर्वत्र विक्रीचा दबाव दिसला. गेल्या तीन महिन्यांतील बाजारातील ही सर्वात मोठी एकदिवसीय विक्री आहे. निफ्टी ५० मधील ४० शेअर्स लाल निशाणीवर बंद झाले.
बाजार कोणत्या पातळीवर बंद झाला?मंगळवारच्या सत्राच्या अखेरीस, सेन्सेक्स ८४९ अंकांनी घसरून ८०,७८७ च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी २५६ अंकांनी घसरून २४,७१२ वर, तर निफ्टी बँक इंडेक्स ६८९ अंकांनी घसरून ५४,४५० च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी मिडकॅप इंडेक्स ९३५ अंकांनी घसरून ५६,७६६ च्या पातळीवर बंद झाला.
'या' स्टॉक्समध्ये मोठी हालचालफार्मा शेअर्समध्ये विक्री: अमेरिकेने औषधांच्या किमती कमी करण्याच्या घोषणेमुळे फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली.एफएमसीजीमध्ये खरेदी: जीएसटी दरांमध्ये कपातीची शक्यता असल्याने एफएमसीजी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. ब्रिटीनया इंडस्ट्रीज या क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढलेला शेअर ठरला.व्होडाफोन आयडिया जवळपास ९% ने घसरला, कारण सरकारने कंपनीला कोणतेही आर्थिक मदत पॅकेज देण्यास नकार दिला आहे.मारुती सुझुकी १% खाली बंद झाला, तर बाईक्सवर जीएसटी दर कमी होण्याच्या अपेक्षेमुळे आयशर मोटर्स ३% वाढीसह बंद झाला.
बाजारातील या मोठ्या घसरणीची ५ प्रमुख कारणे
- अमेरिकेच्या टॅरिफचा दबाव: अमेरिका भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २५% टॅरिफ आणि २५% अतिरिक्त शुल्क लावणार आहे. यामुळे ट्रम्पचा ५०% टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू होण्याच्या शक्यतेने बाजारात नकारात्मक वातावरण दिसून आले.
- कमजोर जागतिक संकेत: आशियाई बाजार (निक्केई, कोस्पी, हँग सेंग) लाल निशाणीवर होते. त्याचप्रमाणे, अमेरिकेचे बाजारही काल घसरणीसह बंद झाले. या जागतिक दबावामुळे विकसनशील देशांच्या (EMs) बाजारांवर नकारात्मक परिणाम झाला.
- परदेशी गुंतवणूकदारांची (FIIs) विक्री: परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्री सुरूच आहे. सोमवारच्या सत्रात त्यांनी २,४६६ कोटी रुपयांचे शेअर्स विकले, ज्यामुळे बाजारातील भावना आणि तरलता दोन्हीवर दबाव आला.
- रुपया कमकुवत : डॉलरच्या मागणीमुळे आणि टॅरिफच्या अनिश्चिततेमुळे रुपया २२ पैशांनी घसरून ८७.७८ वर पोहोचला, ज्यामुळे बाजारातील नकारात्मकता आणखी वाढली.
वाचा - २५ वर्षांचे गृहकर्ज फक्त १० वर्षांत फेडा! जाणून घ्या ही 'मास्टर स्ट्रॅटेजी' आणि वाचवा लाखो रुपये
- व्होलॅटिलिटी इंडेक्स (VIX) मध्ये वाढ: इंडिया VIX ५% पेक्षा जास्त वाढून १२.३८ वर पोहोचला. गुंतवणूकदारांमधील जोखमीची भावना वाढल्याचे हे लक्षण आहे.