Stock Market : आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहार सत्रात भारतीय शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. मंगळवारी दिवसभर चढ-उतारानंतर, निफ्टी (Nifty) आणि सेन्सेक्स (Sensex) घसरणीसह बंद झाले. मात्र, मिडकॅप (Midcap) आणि स्मॉलकॅप (Smallcap) निर्देशांक किंचित वाढीसह स्थिरावले, तर संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सनी चांगली कामगिरी केली.
बाजार कोणत्या पातळीवर बंद झाला?आज दिवसभराच्या व्यवहारानंतर, निफ्टी १७५ अंकांनी घसरून २४,८२६ वर बंद झाला. दुसरीकडे, सेन्सेक्स ६२५ अंकांनी घसरून ८१,५५२ वर स्थिरावला. निफ्टी बँक (Nifty Bank) देखील २१९ अंकांनी घसरून ५५,३५३ वर बंद झाला.
कोण वधारले, कोण घसरले?आज संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये सलग पाचव्या सत्रात वाढ दिसून आली. यात गार्डन रीच (Garden Reach) कंपनीचे शेअर ३% वाढीसह बंद झाले.
काही कंपन्यांना मात्र आज फटका
- इंडिगोचे (Indigo) शेअर्स २% ने घसरले, कारण राकेश गंगवाल यांनी मोठ्या प्रमाणात शेअर विकल्याची बातमी होती.
- महाराष्ट्रात ई-बसबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर ओलेक्ट्रा ग्रीनटेकचा (Olectra Greentech) शेअर ७% ने घसरला.
- चौथ्या तिमाहीत तोटा झाल्यानंतर टीटीके प्रेस्टिजचा (TTK Prestige) शेअर ६% घसरला.
- ब्लू डार्टचा (Blue Dart) शेअर EBITDA (एबिटडा) मध्ये कमकुवतपणा आल्यानंतर ५% घसरला.
- बजाज हेल्थचा (Bajaj Health) शेअर EBITDA मध्ये ५२% घट झाल्यामुळे ७% घसरून बंद झाला.
- याउलट, बायर क्रॉपसायन्सेसचे (Bayer CropScience) शेअर आज १०% वाढीसह बंद झाले, ही सकारात्मक बाब होती.
वाचा - बँकेचे काम असेल तर लगेच आटपा! जूनमध्ये १२ दिवस बँका बंद राहणार; RBI कडून कॅलेंडर जाहीर
एकंदरीत, आज शेअर बाजारात काही क्षेत्रांनी चांगली कामगिरी केली असली तरी, एफएमसीजी (FMCG), आयटी (IT) आणि ऑटो (Auto) क्षेत्रातील शेअर्सवर दबाव दिसून आला, ज्यामुळे प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण झाली.