Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजारात 'लाल' निशाण! सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला; आयटी कंपन्यांची वाढली धाकधूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:00 IST

Share Market Down : सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकापासून जवळजवळ ३०० अंकांनी घसरला, तर निफ्टी २६,१५० च्या खाली घसरला.

Share Market Down : भारतीय शेअर बाजारात बुधवारी २४ डिसेंबर रोजी कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली. सुरुवातीच्या सत्रात तेजीचे संकेत देणारा बाजार दुपारनंतर वरच्या स्तरावरून घसरला आणि लाल निशाणात बंद झाला. सेन्सेक्स दिवसभरातील उच्चांकी पातळीवरून सुमारे ३०० अंकांनी कोसळला, तर निफ्टी २६,१५० च्या खाली स्थिरावला. परदेशी गुंतवणूकदारांची सातत्याने सुरू असलेली विक्री आणि अमेरिकेतील 'एच-१बी' व्हिसा नियमांमधील बदलांमुळे आयटी क्षेत्रावर आलेला दबाव, ही बाजार घसरण्यामागची मुख्य कारणे ठरली.

व्यवहाराअंती सेंसेक्स ११६.१४ अंकांनी (०.१४%) घसरून ८५,४०८.७० वर बंद झाला, तर निफ्टी ३७.४५ अंकांच्या (०.१४%) घसरणीसह २६,१३९.७० च्या पातळीवर आला.

बाजार घसरण्यामागची ३ प्रमुख कारणे१. परदेशी गुंतवणूकदारांची विक्रीबाजारातील घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केलेली नफेखोरी. मंगळवारी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेतून १,७९४.८० कोटी रुपयांची शुद्ध विक्री केली. सलग दुसऱ्या दिवशी परदेशी पैशांचा ओघ बाहेर गेल्याने गुंतवणूकदारांचे मनोधैर्य खचले.

२. एच-१बी व्हिसा नियमांचा 'आयटी'ला तडाखाअमेरिकन सरकारने एच-१बी वर्क व्हिसाच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता केवळ लॉटरी नव्हे, तर 'पगार' आणि 'कौशल्या'च्या आधारावर व्हिसा दिला जाईल. या निर्णयामुळे भारतीय आयटी कंपन्यांच्या खर्चात वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सवर झाला. निफ्टी आयटी इंडेक्स आज सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला.

३. फार्मा आणि ऑईल क्षेत्रात नफावसुलीदुपारनंतरच्या सत्रात फार्मा आणि ऑईल अँड गॅस क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नफावसुली पाहायला मिळाली. सन फार्मा आणि डॉ. रेड्डीज लॅब्स यांसारख्या मोठ्या शेअर्समध्ये सुमारे १ टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याने निफ्टीवर दबाव वाढला.

वाचा - 'या' कंपनीला महाराष्ट्रात २,००० कोटींची ऑर्डर; शेअरमध्ये १३ टक्क्यांची तेजी; गुंतवणूकदार मालामाल

काय म्हणतात तज्ज्ञ?जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य मार्केट स्ट्रॅटेजिस्ट आनंद जेम्स यांच्या मते, निफ्टीसाठी २६,१०० ही पातळी आता अत्यंत महत्त्वाची आहे. "२६,१०० ची पातळी सध्या बाजारासाठी मोठा आधार असून येथूनच नवी तेजी सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या बाजार २६,१०० ते २६,३०० या मर्यादित कक्षेत फिरत आहे. यापैकी कोणत्याही एका बाजूला ब्रेकआऊट मिळाल्यास मोठी हालचाल पाहायला मिळू शकते," असे त्यांनी स्पष्ट केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Share Market 'Red': Sensex Falls; IT Sector Worries Increase

Web Summary : Indian share market closed in red due to foreign investment outflows and H-1B visa concerns impacting IT stocks. Sensex fell 300 points. Pharma sector profit booking added pressure.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी