Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर बाजारात रॉकेट तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स १३४९ अंकांनी वधारून ८०,८०३ वर उघडला. निफ्टी ४१२ अंकांनी वधारून २४,४२० वर उघडला. बँक निफ्टी १०६३ अंकांनी वधारून ५४,६५८ वर पोहोचला. तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली आहे. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर निफ्टी फार्मा वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. निफ्टी ऑटोपासून मेटल अँड रियल्टीपर्यंत सर्वत्रच तेजी दिसून येत आहे. शेअर बाजारात आज एवढी तेजी पाहायला मिळाली की त्याचं एकूण बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं.
कामकाजादरम्यान अदानी पोर्ट्स, इटर्नल, बजाज फायनान्स, एल अँड टी आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर सनफार्माच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.
भारताच्या लष्करी कारवाईनंतर पाकिस्ताननं शरणागती पत्करली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे ८ हवाई तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी आणि ५० हून अधिक पाक सैनिक ठार झाल्याची माहिती आहे. या प्रत्युत्तरानंतर खुद्द पाकिस्ताननेच भारताला शस्त्रसंधीचं आवाहन केलं आहे. आज दुपारी १२ वाजता भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ हॉटलाइनवर चर्चा करणार आहेत. भविष्यात होणाऱ्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला युद्धकृत्य मानणार असल्याचं भारतानं स्पष्ट केलंय.
शुल्क तणाव संपणार?
दरम्यान, अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार शुल्कावरून सुरू असलेला संघर्ष आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. अमेरिकेने चीनसोबत व्यापार कराराची घोषणा केली असून, त्याचा संपूर्ण तपशील आज जाहीर करण्यात येणारे. यामुळे जागतिक बाजारात प्रचंड तेजी दिसून येत आहे. गिफ्ट निफ्टी ५०० अंकांनी वधारून २४,५७५ वर पोहोचला, तर डाऊ फ्युचर्स ४५० अंकांनी वधारला. जपानचा निक्केई निर्देशांकही १०० अंकांनी वधारला. रशिया आणि युक्रेन यांच्यातही शांतता प्रस्थापित होण्याची आशा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी झेलेंस्की यांना १५ मे रोजी तुर्कस्तानमध्ये थेट चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. या संभाव्य चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीची आशा वाढली आहे.