Join us

३४५ पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला SME IPO; आता झाला रद्द, गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 09:57 IST

Trafiksol ITS Technologies IPO : या आयपीओनं ३४५.६५ पट ओव्हरसब्सक्राइब केलं होतं. मात्र आता हा आयपीओ रद्द करण्यात आला आहे.

Trafiksol ITS Technologies IPO : १० ते १२ सप्टेंबर २०२४ दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी उघडलेल्या आयपीओनं ३४५.६५ पट ओव्हरसब्सक्राइब केलं. या इश्यूची किंमत ७० रुपये प्रति शेअर होती. कंपनीनं आयपीओच्या माध्यमातून ४४.८७ कोटी रुपये उभे केले. परंतु आता बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) ट्रॅफिकसोल आयटीटेक्नॉलॉजीजचा एसएमई आयपीओ (Trafiksol ITS Technologies IPO) रद्द केला आहे. गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार इश्यू बंद झाल्यानंतर आणि शेअर्सचं वाटप झाल्यानंतर सेबी, तसंच बीएसईला स्मॉल इन्व्हेस्टर्स वेल्फेअर असोसिएशनकडून तक्रार मिळाली. इश्यूसाठी एका विक्रेत्याकडून १७.७० कोटी रुपयांचं सॉफ्टवेअर खरेदी करण्यात आलं होतं, ज्याची आर्थिक स्थिती संशयास्पद होती आणि ज्यानं कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे अॅन्युअल फायनान्शिअल रिपोर्ट सादर केलं नव्हतं असा आरोप करण्यात आला होता. यानंतर बीएसईनं सेबीशी सल्लामसलत करून कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग पुढे ढकलली.

सेबीनं काय म्हटलं?

निष्कर्षांच्या आधारे असा निष्कर्ष काढणं रास्त आहे की संबंधित थर्ड पार्टी व्हेंडर (टीपीव्ही) ही 'शेल एंटिटी' आहे. टीपीव्हीच्या कार्यालयाला जागेच्या तपासणीदरम्यान कुलूप लावण्यात आलं होते आणि आरोपांना उत्तर म्हणून सादर केलेले आर्थिक वर्ष २०२२ ते २०२४ पर्यंतचा त्यांचा अॅन्युअल फायनान्शिअल रिपोर्ट संशयास्पद परिस्थितीत मिळाला होता. कारण, एमबी (मर्चंट बँकर) यांनी तो बीएसईकडे सादर केल्यानंतर त्याच दिवशी ऑडिटरनं त्यावर स्वाक्षरी केली होती, असं सेबीनं आपल्या १६ पानांच्या आदेशात म्हटलंय.

क्लायंट लिस्ट, संचालकांची ओळखपत्रे बनावट

त्यावेळी बीएसईनं सेबीच्या सल्ल्यानुसार कंपनीच्या शेअर्सच्या लिस्टिंगवर बंदी घातली आणि चौकशी सुरू केली. "आपल्या प्रोफाईलमध्ये सादर केलेली क्लायंट लिस्ट आणि संचालकांचे क्रेडिट बनावट होते. शिवाय ही कंपनी अवघ्या २० हजार रुपयांना विकण्यात आल्याचं माजी संचालकांचे प्रतिज्ञापत्र टीपीव्हीकडे आयसीसी सॉफ्टवेअरसारखा गुंतागुंतीचा प्रकल्प राबविण्यासाठी तांत्रिक कौशल्य आणि ऑपरेशनल क्षमतेचा अभाव या निष्कर्षाला पुष्टी देतं, असंही सेबीनं म्हटलं.

कंपनी काय करते?

मार्च २०१८ मध्ये स्थापन झालेल्या नोएडास्थित ट्रॅफिकसोलच्या म्हणण्यानुसार ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सोल्युशन आणि सप्लाय, सर्व्हिस आणि ऑटोमेशनसह इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टमसह सर्वसमावेशक समाधान प्रदान करते. जितेंद्र नारायण दास हे कंपनीचे चेअरमन आणि एमडी आहेत. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीनं ६५.८१ कोटी रुपयांचा महसूल आणि १२.०१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक