Join us

Jindal Worldwide Ltd : 'या' शेअरच्या किंमतीत ५४३% ची वाढ; आता कंपनी देणार एकावर ४ बोनस शेअर, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:00 IST

Jindal Worldwide Ltd : सध्या शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. परंतु अशातही काही कंपन्याच्या शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना दिलासा आणि उत्तम परतावाही दिलाय. परंतु आता वस्त्रोद्योगाशी संबंधित कंपनीनं आपल्या ग्राहकांना चांगली बातमी दिलीये.

सध्या शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. परंतु अशातही काही कंपन्याच्या शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना दिलासा आणि उत्तम परतावाही दिलाय. वस्त्रोद्योगाशी संबंधित जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड ही कंपनी आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स देत आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना १:४ या प्रमाणात बोनस शेअर्स चे वाटप करणार आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक एका शेअरमागे ४ बोनस शेअर्स देणार आहे. जिंदाल वर्ल्डवाइडनं बोनस शेअरची रेकॉर्ड डेट २८ फेब्रुवारी २०२५ निश्चित केली आहे. मंगळवारी बीएसईवर जिंदाल वर्ल्डवाइडचा शेअर २ टक्क्यांनी वधारून ३७५.०५ रुपयांवर बंद झाला.

शेअर्समध्ये जोरदार तेजी

जिंदाल वर्ल्डवाइडच्या शेअर्समध्ये गेल्या ५ वर्षांत ५४३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २८ फेब्रुवारी २०२० रोजी कंपनीचा शेअर ५८.३० रुपयांवर होता. जिंदाल वर्ल्डवाइडचा शेअर २५ फेब्रुवारी २०२५ रोजी ३७५.०५ रुपयांवर बंद झाला. गेल्या चार वर्षांत जिंदाल वर्ल्डवाइडचे शेअर्स ५७१ टक्क्यांनी वधारले. या काळात कंपनीचे शेअर्स ५५.९० रुपयांवरून ३७५ रुपयांवर गेलेत. स्मॉलकॅप कंपनी जिंदाल वर्ल्डवाइडचे मार्केट कॅप मंगळवारी ७५०० कोटी रुपयांच्या पुढे गेलंय.

यावर्षी मात्र घसरण

जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेडच्या शेअर्समध्ये यावर्षी आतापर्यंत ११.२९ टक्क्यांनी घसरण झालीये. स्मॉलकॅप कंपनीचा शेअर १ जानेवारी २०२५ रोजी ४२२.८० रुपयांवर होता. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर ३७५.०५ रुपयांवर बंद झाला. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ७ टक्क्यांची घसरण झाली आहे. १६ फेब्रुवारी २००१ रोजी जिंदाल वर्ल्डवाइडचा शेअर १.८२ रुपयांवर होता. या पातळीवरून कंपनीच्या शेअर्समध्ये २०,५०० टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ४७०.९५ रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २७१.३० रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक