Share Market: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या शुल्कामुळे भारतीय शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. सेन्सेक्सच्या टॉप-१० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजारमूल्य झपाट्याने घसरले. यामध्ये देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि HDFC बँकेचाही समावेश आहे. तर दुसरीकडे, देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी LIC ने घसरत्या बाजारातही गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला.
शेअर बाजारात सलग सहाव्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली. BSE सेन्सेक्स निर्देशांक ७४२.१२ अंकांनी, म्हणजेच ०.९२ टक्के घसरला, तर NSE निफ्टी निर्देशांक २०२.०५ अंकांनी, म्हणजेच ०.८२ टक्के घसरला. यादरम्यान, टॉप-१० सेन्सेक्स फर्म्समध्ये समाविष्ट असलेल्या सहा कंपन्यांनी एकत्रित १,३६,१५१.२४ कोटी रुपये गमावले. रिलायन्स इंडस्ट्रीज व्यतिरिक्त, यामध्ये एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि एचयूएल यांचा समावेश होता.
अंबानींच्या कंपनीला मोठे नुकसानगेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना धक्का देणाऱ्या कंपन्यांमध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य १८,५१,१७४.५९ कोटी रुपयांपर्यंत घसरले आणि गुंतवणूकदारांनी फक्त पाच व्यावसायिक दिवसांत ३४,७१०.८ कोटी रुपये गमावले. खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँक दुसऱ्या क्रमांकावर होती. बँकेचे बाजारमूल्य २९,७२२.०४ कोटी रुपयांनी घसरून १५,१४,३०३.५८ कोटी रुपयांवर आले. तसेच, आयसीआयसीआय बँकेचे एमकॅपदेखील २४,७१९.४५ कोटी रुपयांनी घसरुन १०,२५,४९५.६९ कोटी रुपयांवर आले.
एलआयसीचे गुंतवणूकदार मालामालसेन्सेन्समधील चार कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले. या यादीत टाटा ग्रुपची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एसबीआय, एलआयसी आणि बजाज फायनान्स यांचा समावेश आहे. एलआयसीचे बाजारमूल्य वाढून ५,७७,१८७.६७ कोटी रुपये झाले. यानुसार, गुंतवणूकदारांनी फक्त ५ दिवसांत १७,६७८.३७ कोटी रुपये कमावले.
एलआयसी व्यतिरिक्त, टीसीएस मार्केट कॅप ११,३६०.८ कोटी रुपयांनी वाढून १०,९७,९०८.६६ कोटी रुपयांवर पोहोचले. तर, देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेलाही फायदा झाला आणि एसबीआय मार्केट कॅप ९,७८४.४६ कोटी रुपयांनी वाढून ७,४२,६४९.३४ कोटी रुपये झाले. याशिवाय, बजाज फायनान्सने १८६.४३ कोटी रुपये कमावले.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)