Join us

शेअर बाजार पुन्हा रेड झोनमध्ये बंद; या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, मोदींच्या दौऱ्याचा परिणाम होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 16:50 IST

Closing Bell : अनेक दिवसांपासून शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धक्का बसत आहे. येत्या काही दिवसांत निफ्टी २२,००० च्या पातळीपर्यंत घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Closing Bell : रोज मरे त्याला कोण रडे? अशी अवस्था सध्या शेअर बाजाराची झाली आहे. नफ्यापेक्षा गुंतवणूकदार आज किती कमी तोटा झाला हे पाहत आहेत. शेअर बाजारातील घसरणीचा कल गुरुवारीही कायम राहिला. बाजार सपाटून बंद झाला.  बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स आज ३२.११ अंकांनी घसरुन ७६,१३८.९७ च्या पातळीवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीही १३.८५ अंकांनी कमकुवत होऊन २३,०३१.४० च्या पातळीवर बंद झाला. आजच्या व्यवहारादरम्यान, निफ्टीने इंट्राडे उच्चांक २३,२३५.५० नोंदवला, तर दिवसाचा नीचांक २२,९९२.२० वर दिसला. कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक घसरण झाली?

निफ्टी ५० मधील २७ कंपन्यांचे शेअर्समध्ये घसरणनिफ्टी ५० मध्ये समाविष्ट असलेल्या ५० पैकी २७ कंपन्यांचे शेअर्स लाल चिन्हावर बंद झाले. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, हिरो मोटोकॉर्प, इन्फोसिस आणि लार्सन अँड टुब्रो यांचा समावेश असलेल्या प्रमुख समभागांमध्ये घसरण झाली. जे ४.९३ टक्क्यांपर्यंत तोट्यासह बंद झाले. वाढलेल्या निफ्टी ५० शेअर्समध्ये सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, बजाज फायनान्स आणि सिप्ला आघाडीवर होते. हे शेअर्स ३.१२ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

कोणत्या सेक्टरमध्ये काय घडलं?आजच्या व्यवहाराच्या शेवटी, निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ०.२५ टक्क्यांनी वाढला, तर निफ्टीचा स्मॉलकॅप १०० निर्देशांक ०.३७ टक्क्यांनी घसरून बंद झाला. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, फार्मा, मेटल, हेल्थकेअर, प्रायव्हेट बँक आणि रियल्टी निर्देशांक १.४७ टक्क्यांपर्यंत वाढीसह बंद झाले. त्याचप्रमाणे ऑटो, आयटी, एफएमसीजी, पीएसयू बँक, ओएमसी आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स हे एनएसईवरील क्षेत्रीय निर्देशांकांपैकी एक टक्का घसरले.

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा प्रभाव?पीएम मोदींच्या अमेरिकन दौऱ्यादरम्यान बाजारात सकाळी थोडा उत्साह पाहायला मिळाला. सेन्सेक्स-निफ्टी उघडताच आश्चर्यकारक दिसत होते. दरम्यान, झोमॅटो, कोटक बँकेच्या समभागांमध्ये बंपर वाढ झाली, तर टीसीएस, टायटन आणि इन्फोसिस सारख्या समभागांनी खराब सुरुवात केली. पंतप्रधान मोदी २ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या काळात संरक्षण, व्यापार दर आणि ऊर्जा यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यावरही गुंतवणूकदारांच्या नजरा खिळल्या आहेत.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकगुंतवणूक