Join us
Daily Top 2Weekly Top 5

₹२९१ वरुन ₹९२ वर आला शेअर, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; टाटांची आहे कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 15:17 IST

TTML Share: टाटा समूहाच्या या कंपनीचे शेअर बुधवारी फोकसमध्ये होते. कामकाजादरम्यान यात मोठी वाढ झाली.

TTML Share: टाटा समूहाची कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेडचे म्हणजेच TTML चे शेअर बुधवारी फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. टीटीएमएलच्या शेअर्सनं आज इंट्राडेचा उच्चांकी 98.65 रुपयांचा स्तर गाठला. यापूर्वी मंगळवारी कंपनीचा शेअर 92 रुपयांवर बंद झाला होता.  

शेअर्सच्या या वाढीचे कारण डिसेंबर तिमाहीचे निकाल आहेत. डिसेंबर तिमाहीत टाटा समूहाची कंपनी टीटीएमएलच्या उत्पन्नाबद्दल बोलायचं तर, अनऑडिट केलेली रक्कम 298 कोटी रुपये होती. कंपनीच्या निव्वळ तोट्याबद्दल सांगायचं झालं तर तो 307 कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा 310 कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत निव्वळ तोटा 919 कोटी रुपये झाला आहे. 

शेअरची कामगिरी 

बीएसई वर उपलब्ध आकडेवारीनुसार, टीटीएमएलचे शेअर्स गेल्या एका वर्षात 27 टक्क्यांनी आणि गेल्या सहा महिन्यांत 21 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या पाच वर्षांत, कंपनीच्या शेअर्सनं 3,268.79 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. या काळात त्याची किंमत 2 रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढली. शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 109.10 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 49.80 रुपये आहे. टाटा समूहाचा हा शेअर 11 जानेवारी 2022 रोजी 291.05 रुपयांच्या लाईफ टाईम उच्चांकी स्तरावर पोहोचला होता. सध्या हे शेअर्स त्यांच्या लाईफ टाईम उच्चांकापेक्षा 66 टक्क्यांनी घसरले आहेत. 

काय आहे कंपनीचा व्यवसाय? 

टीटीएमएल ही टाटा टेलिसर्व्हिसेसची उपकंपनी आहे. ही कंपनी तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. कंपनी व्हॉइस आणि डेटा सेवा पुरवते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत. कंपनीचं मार्केट कॅप 18,563.99 कोटी रुपये आहे. 

(टीप- यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजार