Join us

१ लाखांपार जाणार Sensex? मॉर्गन स्टॅनलीचा 'या' शेअर्सवर फोकस, तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 11:59 IST

Sensex Above 1 lakh : २०२४ मध्ये ८६००० अंकांच्या जवळपास पोहोचल्यानंतर सेन्सेक्स आता २०२५ मध्ये १ लाखांचा टप्पा ओलांडू शकतो. दरम्यान, काही शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश दिसून येत आहेत.

Sensex Above 1 lakh : २०२४ मध्ये ८६००० अंकांच्या जवळपास पोहोचल्यानंतर सेन्सेक्स आता २०२५ मध्ये १ लाखांचा टप्पा ओलांडू शकतो. मॉर्गन स्टॅनलीने हा अंदाज वर्तवला आहे. मॉर्गन स्टॅन्लीच्या मते पुढील वर्षी सेन्सेक्स १ लाखांचा टप्पा ओलांडू शकतो. मात्र, जेव्हा बाजारात तेजीचे वातावरण असेल तेव्हा ही तेजी येईल. तर बेस केसमध्ये डिसेंबर २०२५ पर्यंत सेन्सेक्स ९३ हजार अंकांची पातळी गाठू शकतो, असं सांगण्यात आलंय. ६ डिसेंबर २०२४ रोजी सेन्सेक्स ८१,७०० अंकांवर होता.

मॉर्गन स्टॅनलीच्या म्हणण्यानुसार २०२५ मध्ये भारतीय शेअर बाजार चांगली कामगिरी करेल. जागतिक ब्रोकरेज फर्मने मजबूत उत्पन्न वाढ, व्यापक आर्थिक स्थैर्य आणि मजबूत देशांतर्गत भांडवलाचा ओघ यामुळे तेजीच्या दृष्टीकोनातून बीएसई सेन्सेक्स १,०५,००० पर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केलाय. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.

सेन्सेक्स ३० टक्क्यांनी वधारण्याची शक्यता

मॉर्गन स्टॅनलीनं डिसेंबर २०२५ पर्यंत सेन्सेक्स ३० टक्क्यांनी वधारुन १,०५,००० चा टप्पा गाठण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचा बेस आऊटलूक ९३,००० चं  टार्गेट निर्धारित करतो, जो सध्याच्या पातळीपेक्षा १४ टक्क्यांनी अधिक आहे. 'भारत आर्थिक शिस्त राखेल असं बेस आउटलुकमध्ये गृहीत धरण्यात आलं आहे,' असं मॉर्गन स्टॅन्लीचे रिधम देसाई यांच्या हवाल्यानं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. भारत व्यापक आर्थिक स्थैर्य राखेल, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल, असंही मॉर्गन स्टॅनलीनं म्हटलंय.

कोणत्या कंपन्यांवर फोकस?

मॉर्गन स्टॅनलीचा फायनान्स, टेक्नॉलॉजी, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि इंडस्ट्रियल सेक्टरवर फोकस आहे. ब्रोकरेजचा अंदाज आहे की अलीकडील सुधारणांनंतर नजीकच्या भविष्यात स्मॉल आणि मिड कॅप शेअर्स लार्ज कॅप शेअर्सना मागे टाकू शकतात. मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि इन्फोसिस या प्रमुख कंपन्यांवर ब्रोकरेजचं फोकस आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :व्यवसायशेअर बाजार