Join us

२ रुपयांवर आला ३२ रुपयांचा शेअर, सातत्याच्या घसरणीनंतर ट्रेडिंग बंद; गुंतवणूकदार कंगाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:55 IST

SecUR Credentials Ltd: कंपनीच्या या शेअरला लोअर सर्किट लागलंय. सोमवारी हा शेअर ५ टक्क्यांनी घसरून २.३४ रुपयांवर आला आणि मंगळवारी या शेअरचा व्यवहार बंद झाला.

SecUR Credentials Ltd: या वर्षी आतापर्यंत बाजारानं चांगली कामगिरी केलेली नाही. शेअर बाजारात सध्या सातत्यानं घसरण पाहायला मिळत आहे. विजय केडिया, रेखा झुनझुनवाला यांच्यासह बहुतांश गुंतवणूकदारांचाही पोर्टफोलिओ लाल झालाय. दरम्यान, गुंतवणूकदारांचं मोठं करणारा हा शेअर म्हणजे एसईसीयूआर क्रेडेन्शियल्स लिमिटेड. कंपनीच्या या शेअरला लोअर सर्किट लागलंय. सोमवारी हा शेअर ५ टक्क्यांनी घसरून २.३४ रुपयांवर आला आणि मंगळवारी या शेअरचा व्यवहार बंद झाला.

९० टक्क्यांनी घसरलाय शेअर

गेल्या सहा महिन्यांत एसईसीयूआर क्रेडेन्शियल्स लिमिटेडचे शेअर्स ६५ टक्क्यांनी घसरले असून वर्षभरात जवळपास ९० टक्क्यांनी घसरलेत. वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत २० रुपये होती. ६ जानेवारी २०२३ रोजी शेअरची किंमत सुमारे ३२ रुपये होती. म्हणजेच दोन वर्षांत त्यात ९४ टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली. म्हणजे जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये १०,००० रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आतापर्यंत हा शेअर ठेवला असता तर त्याचं मूल्य आज ७०० रुपये असतं.

सेबीनं कंपनीवर केली कारवाई

गेल्या वर्षी सेबीनं बॅकग्राऊंड चेक कंपनी एसईसीयूआर क्रेडेन्शियल्स आणि तिचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) राहुल बेलवलकर यांच्यावर कथित आर्थिक अनियमितता आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या त्रुटींमुळे महत्त्वपूर्ण निर्बंध लादल्याबद्दल सिक्युरिटीज मार्केटमधून बंदी घातली होती. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक