Join us

स्टॉक मार्केटमध्ये बॉलिवूडच्या ‘सर्किट’वर बंदी, अवैधरित्या पैसे कमावल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 16:21 IST

SEBI ने अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी आणि साधना ब्रॉडकास्टच्या प्रमोटर्ससह 31 संस्थांवर बंदी घातली आहे.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने गुरुवारी अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेटी आणि साधना ब्रॉडकास्टच्या प्रमोटर्ससह 31 संस्थांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यापार करण्यावर बंदी घातली आहे. गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स विकत घेण्यासाठी दिशाभूल करणारे व्हिडिओ YouTube चॅनलवर पोस्ट केल्याप्रकरणी नियामकाने हे पाऊल उचलले आहे. बंदी घालण्यात आलेल्या प्रमोटर्समध्ये श्रेया गुप्ता, गौरव गुप्ता, सौरभ गुप्ता, पूजा अग्रवाल आणि वरुण एम आहेत.

41.85 कोटी रुपये जप्त करण्याचे आदेशयूट्यूब चॅनेलवर दिशाभूल करणारे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नियामकाने या युनिट्सना झालेल्या 41.85 कोटी रुपयांचा बेकायदेशीर नफा जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात अर्शद वारसीला 29.43 लाख रुपयांचा, तर त्यांच्या पत्नीला 37.56 लाख रुपयांचा नफा झाल्याचे सेबीने म्हटले आहे. टीव्ही चॅनल साधना ब्रॉडकास्टच्या शेअर्सच्या मूल्यात काही संस्थांकडून हेराफेरी होत असल्याच्या तक्रारी सेबीला मिळाल्या होत्या. गुंतवणुकदारांना आमिष दाखवून दिशाभूल करणारे हे व्हिडिओ YouTube वर अपलोड करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

व्हिडिओनंतर शेअर्समध्ये वाढ झाली नियामकाने एप्रिल-सप्टेंबर 2022 मध्ये या प्रकरणाची तपासणी केली. एप्रिल ते जुलै 2022 या कालावधीत साधनाच्या शेअर्सच्या किंमती आणि व्हॉल्यूममध्ये मोठी वाढ झाल्याचे तपासात समोर आले आहे. जुलै 2022 च्या दुसऱ्या पंधरवड्यात साधनाविषयी खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ दोन YouTube चॅनेलवर अपलोड करण्यात आले होते. या व्हिडिओंनंतर साधनाच्या स्टॉकच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. साधना ब्रॉडकास्ट अदानी समूहाकडून विकत घेतले जाईल, असा दावाही दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओमध्ये करण्यात आला होता.

टॅग्स :व्यवसायशेअर बाजारशेअर बाजारअर्शद वारसी