Join us

Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 12:21 IST

Rosmerta Digital Services IPO: हा आयपीओ १८ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत गुंतवणूकीसाठी उघडणार होता. मात्र, आता या आयपीओची तारीख बदलण्यात आलीये.

Rosmerta Digital Services IPO: रोझमर्टा डिजिटल सर्व्हिसेसचा आयपीओ उघडण्यापूर्वीच पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वी हा आयपीओ १८ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत गुंतवणूकीसाठी उघडणार होता. मात्र, आता या आयपीओची तारीख बदलण्यात आलीये. सध्या तरी नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. रोझमर्टा डिजिटल सर्व्हिसेस हा एसएमई सेगमेंटमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ मानला जात होता. १४० ते १४७ रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. यात १.४ कोटी इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा समावेश होता. कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये २२ रुपयांच्या प्रीमियमसह व्यवहार करत आहे.

काय म्हणाली कंपनी?

बाजारातील प्रतिकूल परिस्थितीमुळे २०६ कोटी रुपयांची प्राथमिक शेअर्सची विक्री पुढे ढकलण्याचा निर्णय १४ नोव्हेंबर रोजी कंपनीनं घेतला. यामुळे बाजारात सुरू असलेली घसरण पाहता आयपीओची तारीख पुढे ढकलणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. 'मुळात १८ नोव्हेंबरला सुरू होणारा आयपीओ पुढे ढकलण्यात आला आहे,' असं कंपनीनं म्हटलंय. कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट केले जातील. रोझमर्टा डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड ही रोझमर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेडची (आरटीएल) उपकंपनी आहे.

कंपनीचा व्यवसाय काय?

कंपनी ऑटोमोटिव्ह कम्पोनंट्स आणि अॅक्सेसरीजसाठी डिजिटली सक्षम सेवा प्रदान करते. आयपीओतून मिळणाऱ्या रकमेचा वापर कंपनी वापर कंपनी मुंबईत कार्यालयीन जागा खरेदी, भारतातील विविध भागात गोदामं, मॉडेल कार्यशाळा आणि एक्सपिरिअन्स सेंटर स्थापन करणं, आयटी पायाभूत सुविधा उभारणं, कार्यशील भांडवलाची आवश्यकतेसाठी करणार आहे. नार्नोलिया फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि बीलाइन कॅपिटल अॅडव्हायझर्सची या आयपीओसाठी मर्चंट बँकर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक