Join us

Richfield Financial Services: 'ही' कंपनी देतेय एकावर एक बोनस शेअर, रेकॉर्ड डेट झाली निश्चित; ६ महिन्यांत पैसे केलेत डबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 10:49 IST

Richfield Financial Services: आता पात्र गुंतवणूकदारांना कंपनीच्या वतीनं १ शेअर बोनस दिला जाणार आहे. ज्यासाठी रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आली आहे.

Richfield Financial Services : रिचफिल्ड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअर्सनं गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. आता पात्र गुंतवणूकदारांना कंपनीच्या वतीनं १ शेअर बोनस दिला जाणार आहे. ज्यासाठी रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवारी रिचफिल्ड सर्व्हिसेस लिमिटेडचे शेअर्सला अपर सर्किट लागलं. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सचा भाव २ टक्क्यांनी वाढून ११७.८२ रुपये झाला.

फेब्रुवारीत एक्स बोनस डेट

कंपनीनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटलंय की, १ शेअरवर १ शेअर बोनस दिला जाईल. या बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट शुक्रवार, १४ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांचं नाव या दिवशी रेकॉर्ड बुकमध्ये राहील, त्यांनाच बोनस शेअर्सचा लाभ मिळणार आहे. कंपनी पहिल्यांदाच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देत आहे.

रिचफिल्ड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडनं लाभांशदेखील दिला आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कंपनीनं लाभांश दिला होता. त्यावेळी कंपनीनं पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर ०.८० रुपये लाभांश दिला.

कामगिरी उत्तम

अवघ्या आठवडाभरात या कंपनीच्या शेअरच्या किमतीत १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर या नवीन वर्षात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत २६ टक्क्यांनी वाढ झाली. अवघ्या ६ महिन्यांत या शेअरनं गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेत. कंपनीने या काळात १२५ टक्के परतावा दिलाय. याच कालावधीत सेन्सेक्समध्ये ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

रिचफिल्ड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ६०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ११७.८२ रुपये आणि शेअरचा नीचांकी स्तर १६.५३ रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक