PNB Housing Finance Stock: पीएनबी हाऊसिंग फायनान्सच्या शेअरमध्ये शुक्रवारी सकाळी मोठी घसरण पाहायला मिळाली. बीएसईवर कंपनीचे शेअर्स १५.८१ टक्क्यांनी घसरले आणि लोअर सर्किटवर पोहोचले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे ८३८ रुपये होती. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीई) गिरीश कौसगी यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिल्यानं कंपनीच्या शेअरवर मोठा परिणाम दिसून आला. दिवसाच्या सुरुवातीला हा शेअर १०% घसरणीसह उघडला, परंतु विक्रीचा दबाव इतका जास्त होता की लवकरच तो सुमारे १६% घसरणीसह लोअर सर्किटवर पोहोचला.
गिरीश कौसगी यांचा राजीनामा
लाइव्हमिंटच्या वृत्तानुसार, गिरीश कौसगी यांनी २८ ऑक्टोबर २०२५ पासून आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. ऑक्टोबर २०२२ मध्ये ते चार वर्षांच्या मुदतीसाठी कंपनीत रुजू झाले होते. कंपनीनं यानंतर एक निवेदन जारी केलंय.
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
गिरीश कौसगी यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या मजबूत पायावर आधारित आमचे धोरणात्मक प्राधान्यक्रम, व्यवसायाचे लक्ष आणि वाढीची दिशा कायम आहे. यापूर्वी केल्याप्रमाणे, आम्ही विकास, असेट क्वालिटी आणि मार्जिनशी संबंधित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उद्योग अनुभव आणि कौशल्य असलेल्या नवीन व्यावसायिकाचा शोध सुरू करू, असं त्यांनी नमूद केलंय. कौसगी यांच्या कार्यकाळात पीएनबी हाऊसिंगच्या शेअर्समध्ये २०० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसून आली.
पहिल्या तिमाहीचा निकाल उत्तम पण...
कंपनीनं नुकतेच २१ जुलै २०२५ रोजी आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीचे (वित्त वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीचे) निकाल जाहीर केले. रिपोर्टनुसार, कंपनीचा निव्वळ नफा २३ टक्क्यांनी वाढून ५३४ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ४३३ कोटी रुपये होता. निकाल चांगले आले असले तरी वरच्या पातळीवरील बदलाच्या बातमीनं गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला आणि मोठी विक्री झाली. पीएनबी हाऊसिंग फायनान्सनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत, या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न २,०८२ कोटी रुपयांवर पोहोचल्याचं म्हटलंय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामिगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)