Lenskart IPO GMP: लेन्सकार्ट आयपीओची तारीख आणि प्राइस बँड समोर आला आहे. कंपनीचा आयपीओ ३१ ऑक्टोबर, शुक्रवार रोजी उघडेल आणि ४ नोव्हेंबर मंगळवार रोजी बंद होईल. कंपनीनं प्रत्येक शेअरची किंमत ३८२ ते ४०२ रुपये निश्चित केली आहे. हा आयपीओ भारताच्या वेगानं वाढणाऱ्या कंझ्युमर-टेक सेक्टरमधील सर्वाधिक अपेक्षित आयपीओपैकी एक मानला जात आहे. या आयपीओला अब्जाधीश राधाकिशन दमाणी यांचाही पाठिंबा मिळाला असून, त्यांनी यात गुंतवणूक केली आहे. सोमवार रोजी ग्रे मार्केटमध्ये या आयपीओने जोरदार एन्ट्री केली.
या आयपीओचा एकूण इश्यू आकार ७,२७८.०२ कोटी रुपये इतका आहे. या इश्यूमध्ये २,१५० कोटी रुपये मूल्याचे ५.३५ कोटी नवीन शेअर्स जारी केले जातील, तर ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत ५,१२८.०२ कोटी रुपये मूल्याचे १२.७६ कोटी शेअर्स विकले जातील. या शेअर्सचे वाटप ६ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे, तर शेअर बाजारात या आयपीओची लिस्टिंग १० नोव्हेंबरला होऊ शकते. आयपीओद्वारे मिळालेली रक्कम कंपनी आपल्या स्टोअर्सची संख्या वाढवण्यासाठी, तंत्रज्ञान अधिक मजबूत करण्यासाठी आणि ब्रँडिंग व मार्केटिंगवर खर्च करण्यासाठी वापरणार आहे.
डीमार्टचे संस्थापक असलेले राधाकिशन दमाणी यांनी लेन्सकार्टमध्ये ९० कोटी रुपयांची महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक लेन्सकार्टच्या भविष्यातील वाढीच्या संभाव्यतेवर गुंतवणूकदारांचा असलेला विश्वास दर्शवते. याशिवाय, सॉफ्टबँक, टेमासेक, केदारा कॅपिटल आणि अल्फा वेव्ह वेंचर्स यांसारख्या मोठ्या कंपन्या लेन्सकार्टच्या सध्याच्या प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये सामील आहेत.
वर्षातील चौथा सर्वात मोठा आयपीओ
लेन्सकार्टचा आयपीओ हा २०२५ या वर्षातील आतापर्यंतचा चौथा सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे. यापूर्वी, टाटा कॅपिटल, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस (HDB Financial Services) आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स (LG Electronics) या मोठ्या कंपन्यांचे आयपीओ आले आहेत. यापैकी टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स या दोन कंपन्यांचे आयपीओ याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये आले आहेत.
कंपनीची कमाई किती?
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये लेन्सकार्टने २९७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा (Net Profit) कमावला आहे. हा नफा आर्थिक वर्ष २०२४ मध्ये झालेल्या १० कोटी रुपयांच्या तोट्याच्या तुलनेत खूप मोठा बदल दर्शवतो. कंपनीचा महसूल ६,६२५ कोटी रुपये राहिले, जो मागील वर्षाच्या तुलनेत २२ टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीनं आपल्या या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय खर्च कमी करणं, ब्रँड मजबूत करणं आणि तंत्रज्ञानावर आधारित आपल्या मॉडेलला दिलं आहे.
ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त एन्ट्री
लेन्सकार्टच्या आयपीओने ग्रे मार्केटमध्ये जोरदार एन्ट्री केली आहे. आज सोमवार रोजी त्याचा प्राइस बँड जारी होताच, त्याचा जीएमपी (GMP - Grey Market Premium) वाढला. त्याचा ग्रे मार्केट प्रीमियम ७५ रुपयांवर पोहोचला आहे. याचा अर्थ, ४०२ रुपयांच्या आयपीओ किंमतीच्या तुलनेत १८.६६% च्या वाढीसह तो ४७७ रुपयांवर व्यवहार करत आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Lenskart's IPO opens October 31st, with a price of ₹382-402 per share. The ₹7,278.02 crore IPO sees strong grey market interest and is backed by Radhakishan Damani. Proceeds will fund store expansion and technology. The company reported a net profit of ₹297 crore in FY25.
Web Summary : Lenskart का IPO 31 अक्टूबर को खुलेगा, जिसका मूल्य ₹382-402 प्रति शेयर है। ₹7,278.02 करोड़ के IPO को ग्रे मार्केट में अच्छी दिलचस्पी मिल रही है और इसे राधाकिशन दमानी का समर्थन प्राप्त है। आय का उपयोग स्टोर विस्तार और प्रौद्योगिकी के लिए किया जाएगा। कंपनी ने FY25 में ₹297 करोड़ का शुद्ध लाभ दर्ज किया।