Join us

PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:38 IST

PC Jewellers Share Price: पहिल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात सुमारे ८०% वाढ झाली आहे. जोरदार मागणीमुळे महसुलात ही वाढ दिसून आली असल्याचं कंपनीनं सांगितलं.

PC Jewellers Share Price: ज्वेलरी कंपनी पीसी ज्वेलर्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये शुक्रवारी तेजी दिसून आली. पीसी ज्वेलर्सचा शेअर शुक्रवारी १६ टक्क्यांनी वधारून १६.३८ रुपयांवर पोहोचला. पहिल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात सुमारे ८०% वाढ झाली आहे. जोरदार मागणीमुळे महसुलात ही वाढ दिसून आली असल्याचं कंपनीनं सांगितलं. पीसी ज्वेलर्सनं चालू आर्थिक वर्षात ते पूर्णपणे कर्जमुक्त होणार असल्याचं म्हटलं आहे. पीसी ज्वेलरच्या शेअरमध्ये सलग चौथ्या दिवशी तेजी पाहायला मिळत आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ३० टक्के वाढ झाली.

सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होत असले तरी कंपनीनं मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे ८०% स्वतंत्र महसूल वाढ साध्य केली असल्याचं पीसी ज्वेलर्सनं म्हटलं. कंपनीचं म्हणणं आहे की, त्याच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे, ग्राहकांनी लग्न आणि सणांसाठी सोन्याचे दागिने खरेदी केलेत.

तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर

कंपनी होणार कर्जमुक्त

पीसी ज्वेलर्सनं २०२४-२५ या आर्थिक वर्षात बँकर्सच्या कर्जाच्या ५०% पेक्षा जास्त परतफेड केली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये पूर्णपणे कर्जमुक्त होण्याचे ज्वेलरी कंपनीचं उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कंपनीनं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कर्जाच्या सुमारे ७.५ टक्के परतफेड केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कंपनीनं आपल्या कामकाजाचे सर्व पैलू सुरळीत आणि मजबूत केले आहेत. येत्या तिमाहीत कंपनीला उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.

१० भागांमध्ये शेअर स्प्लिट

पीसी ज्वेलर्सने आपल्या शेअर्सला १० भागांत स्प्लिट केलं आहे. डिसेंबर २०२४ मध्ये कंपनीनं आपल्या शेअर्सना १० भागात स्प्लिट केलं. कंपनीनं १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरची प्रत्येकी १ रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या १० शेअर्समध्ये विभागणी केली आहे. पीसी ज्वेलर्सनं यापूर्वी जुलै २०१७ मध्ये आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स दिले होते. कंपनीने १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. म्हणजेच कंपनीने प्रत्येक १ शेअरमागे १ बोनस शेअर वाटला.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक