Parmeshwar Metal Share Listing: एसएमई स्टॉक परमेश्वर मेटलनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. परमेश्वर मेटलचा शेअर ३८.५२ टक्क्यांच्या प्रीमियमसह ८४.५० रुपयांवर बाजारात लिस्ट झाला. आयपीओमध्ये परमेश्वर मेटलच्या शेअरची किंमत ६१ रुपये होती. कंपनीचा आयपीओ २ जानेवारी २०२५ रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला आणि ६ जानेवारीपर्यंत खुला राहिला. परमेश्वर मेटलची एकूण इश्यू साइज २४.७४ कोटी रुपयांपर्यंत होती.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लिस्टिंगनंतर अपर सर्किट
परमेश्वर मेटलच्या शेअरमध्ये ३८ टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर लिस्टिंग झाल्यानंतर वादळी तेजी दिसून आली. परमेश्वर मेटलचा शेअर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटवर ८८.७२ रुपयांवर पोहोचला. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ९६.३३ टक्के होता, तो आता ७०.८१ टक्क्यांवर आलाय. आयपीओतून मिळणाऱ्या रकमेचा वापर दहेगाम येथे नवीन उत्पादन युनिट उभारण्यासाठी, कॉपर मेल्टिंगसाठी फर्नेस रेनोव्हेशनसाठी केला जाणार आहे. तसंच, ते आपल्या कार्यशील भांडवलाच्या गरजा पूर्ण करेल.
६०० पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब
परमेश्वर मेटलचा आयपीओ एकूण ६०७.०७ पट सब्सक्राइब झाला. रिटेल इन्व्हेस्टर्स कॅटेगरीत कंपनीच्या आयपीओमध्ये ५९७.०९ पट तर, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स (NII) कोटा १२०२.८३ पट सबस्क्राइब झाला. परमेश्वर मेटलच्या आयपीओमध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (क्यूआयबी) श्रेणीत १७७.३२ पट सबस्क्रिप्शन मिळालं. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना केवळ १ लॉटसाठी बोली लावता येणार होती. आयपीओच्या एका लॉटमध्ये २००० शेअर्स होते. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये १,२२,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
कंपनीचा व्यवसाय काय?
परमेश्वर मेटल ऑगस्ट २०१६ मध्ये सुरू करण्यात आली. ही कंपनी कॉपर स्क्रॅप रिसायकलिंगद्वारे कॉपर वायर आणि रॉड्स तयार करते. कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट गुजरातमधील दहेगाम येथे आहे. कंपनीची उत्पादनं पॉवर केबल, वायर मेकिंग, ट्रान्सफॉर्मर आणि ऑटोमोटिव्ह उद्योगात वापरली जातात.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)