Join us

Ola कंपनीचा एक निर्णय आणि शेअर बनला रॉकेट, भाविष अग्रवाल यांची खेळी यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 12:55 IST

Ola Electric Mobility share: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शेअरमध्ये गुरुवारी, २६ डिसेंबररोजी ६ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. यामागे एक मोठं कारण आहे.

Ola Electric Mobility share: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शेअरमध्ये गुरुवारी, २६ डिसेंबररोजी ६ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. कंपनीचा शेअर इंट्राडे उच्चांकी पातळी ९९.९० रुपयांवर पोहोचला. शेअर्सच्या या वाढीमागे कंपनीची एक घोषणा आहे. खरं तर कंपनीने आपल्या स्टोअर्सची संख्या ४,००० पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीनं सर्व्हिस सेंटरसह ३,२०० हून अधिक नवीन स्टोअर्स जोडले आहेत आणि विस्तार मेट्रो, टियर-१ आणि टियर-२ शहरांच्या पलीकडे झाला आहे.

ओला इलेक्ट्रिकने मूव्हओएस ५ बीटा व्हर्जनसाठी प्रायोरिटी रजिस्ट्रेशन उघडलं आहे, ज्याच्या फीचर्समुळे ग्रुप नेव्हिगेशन, लाइव्ह लोकेशन शेअरिंग आणि ओला मॅपद्वारे चालवल्या जाणाऱ्या रोड ट्रिप मोडचा समावेश आहे. याशिवाय कंपनीनं लिमिटेड एडिशन ओला एस १ प्रो सोना लाँच केलं आहे, ज्यात अस्सल २४ कॅरेट गोल्ड प्लेटेड एलिमेंट्स आहेत.

ब्रोकरेजनं काय म्हटलं?

ब्रोकरेज फर्म सिटीनं २७ नोव्हेंबर रोजी एका नोटमध्ये म्हटलं होतं की, ओला इलेक्ट्रिकच्या लवकरच लाँच होणाऱ्या मोटारसायकल आणि इलेक्ट्रिक थ्री व्हीलर्सच्या विक्रीत वाढ होईल. सर्व्हिसेसची स्थिती नकारात्मक असली तरी भविष्यात ती कमी होईल, असं सिटीनं म्हटलंय. सिटीनं ओला इलेक्ट्रिकला ९० रुपयांचे प्राइस टार्गेट देऊन 'बाय' रेटिंग दिलं होतं. हा शेअर आता त्या किमतीच्या वर ट्रेड करत आहे. ओला इलेक्ट्रिकवर सात विश्लेषकांपैकी पाच विश्लेषकांना 'बाय' रेटिंग दिलंय, तर इतर दोघांनी 'सेल' रेटिंग दिलंय. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे शेअर्स सुरुवातीच्या उच्चांकी पातळीवर आहेत. या वर्षी कंपनीचा आयपीओ ७६ रुपयांवर आला होता. गेल्या महिन्याभरात हा शेअर ३४ टक्क्यांनी वधारला आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :ओलाशेअर बाजार