Ola Electric Q3 Results and Stock Price: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीनं शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर तिमाहीत त्यांचा महसूल वार्षिक आधारावर ५५ टक्क्यांनी घसरून ४७० कोटी रुपयांवर आला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा महसूल १,०४५ कोटी रुपये इतका होता. तसेच सप्टेंबर तिमाहीतील ६९० कोटी रुपयांच्या महसुलाच्या तुलनेत यात ३१.९ टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, या काळात ग्रॉस मार्जिनमध्ये सुधारणा झाली असून वार्षिक आधारावरील तोट्यात काही प्रमाणात घट दिसून आली आहे.
तोटा आणि ऑपरेटिंग कामगिरीचा लेखाजोखा
डिसेंबर तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ तोटा ४८७ कोटी रुपये राहिला आहे. हा तोटा मागील तिमाहीतील ४१८ कोटी रुपयांच्या तुलनेत १६.५ टक्क्यांनी अधिक आहे. मात्र, वार्षिक आधारावर विचार केल्यास तोट्यात १३.७ टक्क्यांची घट झाली आहे, कारण गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ५६४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीचा 'ॲडजस्टेड ऑपरेटिंग EBITDA' तोटा देखील तिमाही आधारावर २५ टक्क्यांनी वाढून ३२३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो सप्टेंबर तिमाहीत २५८ कोटी रुपये होता. वार्षिक स्तरावर हा तोटा ३४.६ टक्क्यांनी कमी झालाय. दरम्यान, EBITDA मार्जिनमध्ये घसरण होऊन ते -३७.४ टक्क्यांवरून -६८.७ टक्क्यांवर पोहोचलाय.
ग्रॉस मार्जिनमध्ये सुधारणा पण...
डिसेंबर तिमाहीत ओला इलेक्ट्रिकच्या ग्रॉस मार्जिनमध्ये सकारात्मक सुधारणा झाली आहे. कंपनीचं एकत्रित ग्रॉस मार्जिन ३४.३ टक्के राहिलं, जे सप्टेंबर तिमाहीतील ३०.९ टक्क्यांच्या तुलनेत ३.४ टक्क्यांनी जास्त आहे. ग्रॉस प्रॉफिट १६१ कोटी रुपये नोंदवण्यात आलं असून तो वार्षिक आधारावर १७ टक्क्यांनी कमी झाला आहे. दुसरीकडे, कंपनीच्या वाहनांच्या डिलिव्हरीमध्ये मोठी घट पाहायला मिळाली. डिसेंबर तिमाहीत केवळ ३२,६८० युनिट्सची डिलिव्हरी झाली, जी मागील तिमाहीच्या (५२,६६६ युनिट्स) तुलनेत ३८ टक्क्यांनी कमी आहे. वार्षिक आधारावर ही घट ६१ टक्के इतकी मोठी आहे, कारण गेल्या वर्षी याच काळात ८४,०२९ युनिट्सची विक्री झाली होती.
खर्चाचा तपशील आणि शेअर्सची स्थिती
कंपनीचा एकूण ऑपरेटिंग खर्च तिमाही आधारावर ३.८ टक्क्यांनी वाढून ४३२ कोटी रुपये झाला आहे, मात्र वार्षिक आधारावर यात ३४ टक्क्यांची कपात झाली आहे. ऑटोमोटिव्ह सेगमेंटचा महसूल ३२ टक्क्यांनी घटून ४६७ कोटी रुपये राहिला. शेअर बाजारातील कामगिरीबद्दल सांगायचे तर, निकाल जाहीर होण्यापूर्वी शुक्रवारी ओला इलेक्ट्रिकचा शेअर ३०.०९ रुपयांवर बंद झाला होता. वर्ष २०२६ मध्ये आतापर्यंत या शेअरमध्ये १७.५९ टक्क्यांची घसरण झाली आहे, तर गेल्या वर्षभरात हा शेअर ५० टक्क्यांहून अधिक तुटला आहे. या कमकुवत निकालांनंतर सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या व्यवहारात ओला इलेक्ट्रिकचा शेअर बाजाराच्या केंद्रस्थानी राहील.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Ola Electric's Q3 revenue fell 55% to ₹470 crore. Net loss increased to ₹487 crore, despite improved gross margins. Vehicle deliveries also saw a significant drop, impacting share performance. Investors are watching closely.
Web Summary : ओला इलेक्ट्रिक का Q3 राजस्व 55% गिरकर ₹470 करोड़ हो गया। सकल मार्जिन में सुधार के बावजूद शुद्ध घाटा बढ़कर ₹487 करोड़ हो गया। वाहन डिलीवरी में भी गिरावट आई, जिससे शेयर प्रदर्शन प्रभावित हुआ। निवेशक बारीकी से देख रहे हैं।