Join us

Ola Electric चे शेअर्सचे आपटले; मोठ्या अधिकाऱ्यांशी निगडित आहे कारण, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:42 IST

Ola Electric Mobility Share Price Today: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण झाली. या घसरणीमागे एक मोठं कारण आहे.

Ola Electric Mobility Share Price Today: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण झाली. या घसरणीमागे ओलाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर (CMO) अंशुल खंडेलवाल आणि चीफ टेक्निकल ऑफिसर (CTO) सुवोनिल चॅटर्जी यांचा राजीनामा आहे. राजीनाम्यानंतर ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअरचा भाव तीन टक्क्यांहून अधिक घसरून ८७.३५ रुपयांवर आला.

आज ओलाचा शेअर ३.१५ टक्क्यांनी घसरून ८७.१० रुपयांवर आला. दरम्यान, तो ८६ रुपयांच्या नीचांकी पातळीवरही आला होता. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १५७.४० रुपये आणि नीचांकी स्तर ६६.६६ रुपये आहे.

कंपनीनं दिली माहिती

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीनं शुक्रवार, २७ डिसेंबरपासून तात्काळ प्रभावानं आपल्या सीटीओ आणि सीएमओच्या राजीनाम्याची घोषणा केली. बंगळुरू स्थित इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उत्पादक कंपनीनं शुक्रवारी जाहीर केलेल्या नियामक फायलिंगमध्ये त्यांच्या राजीनाम्यामागील वैयक्तिक कारणांचा उल्लेख केलाय.

कंपनीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अंशुल खंडेलवाल आणि चीफ टेक्निकल ऑफिसर सुवोनिल चॅटर्जी यांनी २७ डिसेंबर २०२४ पासून राजीनामा दिला आहे. फूडपांडाच्या अधिग्रहणानंतर अंशुल खंडेलवाल २०१९ मध्ये ओला इलेक्ट्रिकमध्ये सहभागी झाले. येथे त्यांनी मार्केटिंग प्रमुख म्हणून काम पाहिलं. ओला फूड्समध्ये काम केल्यानंतर ते ओला इलेक्ट्रिकलमध्ये गेले आणि २०२२ मध्ये सीएमओच्या भूमिकेत आले. चॅटर्जी २०१७ मध्ये ओला इलेक्ट्रिकमध्ये डिझाइन हेड म्हणून रुजू झाले आणि २०२१ मध्ये त्यांना सीटीओपदी बढती मिळाली.

अनेक अधिकाऱ्यांचे राजीनामे

त्यांच्या राजीनाम्यामुळे कंपनीतील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांच्या बाहेर पडण्याच्या ट्रेंडमध्ये भर पडली आहे. यापूर्वी २०२४ मध्ये कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी प्रमेंद्र तोमर यांनी कंपनीची साथ सोडली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये चीफ पब्लिक ऑफिसर एन. बालचंदर यांनी कंपनी सोडली. ओला इलेक्ट्रिकच्या पुनर्रचनेच्या महत्त्वपूर्ण पावलानंतर हे बदल करण्यात आले आहेत. यात गेल्या महिन्यात ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :ओलाशेअर बाजारगुंतवणूक