Join us

Ola Electric च्या शेअरनं पकडला तुफान 'स्पीड'; ६ दिवसांत ४२% ची वाढ, गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:03 IST

Ola Electric Mobility share: गेल्या वर्षी शेअर बाजारात लिस्ट झालेल्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा जोरदार वाढ झाली आहे.

Ola Electric Mobility share: गेल्या वर्षी शेअर बाजारात लिस्ट झालेल्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा जोरदार वाढ झाली आहे. बुधवार, ३ सप्टेंबर रोजी शेअर जवळपास ११% वाढून ६८.५७ रुपयांवर पोहोचला. गेल्या सहा ट्रेडिंग सत्रांपैकी पाच सत्रांमध्ये या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून आली. २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सहा ट्रेडिंग दिवसांत ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स ४२% नं वाढले आहेत. या वाढीसह, हा शेअर आता त्याच्या आयपीओ इश्यू प्राईज ₹७६ प्रति शेअरच्या जवळ आला आहे. ऑगस्ट महिन्यात हा शेअर ३५% नं वाढला होता, जो ऑगस्ट २०२४ मध्ये लिस्ट झाल्यानंतरचा सर्वोत्तम महिना होता.

ओलाकडून सकारात्मक वृत्त

गेल्या काही दिवसांपासून ओला इलेक्ट्रिककडून सतत सकारात्मक बातम्या येत आहेत. अलिकडेच, ओलाच्या जनरेशन-३ स्कूटर सेगमेंटला ऑटोमोटिव्ह आणि त्याच्या कम्पोनंट्स क्षेत्रासाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेअंतर्गत प्रमाणपत्र मिळालं आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियानं (एआरएआय) ओलाच्या सर्व सात एस१ जनरेशन-३ स्कूटर्सना हे प्रमाणपत्र दिलं आहे.

"ट्रम्प यांना अर्थशास्त्राची काहीच समज नाही..," 'या' दिग्गज विश्लेषकानं दिला इशारा

या कामगिरीसह, ओला इलेक्ट्रिकचे जनरेशन-२ आणि जनरेशन-३ स्कूटर सेगमेंट आता पीएलआय-प्रमाणित झालं असल्याचं ओलानं म्हटलं. यामुळे ओला इलेक्ट्रिकला आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत नफ्यात मोठी वाढ नोंदवता येईल.

आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी उचलली पावलं

याशिवाय, ओला इलेक्ट्रिकला आयपीओद्वारे उभारलेल्या निधीचे रिअलोकेट करण्यासाठी भागधारकांची मान्यता मिळाली आहे. यामुळे कंपनीला तिच्या पुढील वाढीच्या टप्प्यासाठी भांडवल उपलब्ध होईल आणि तिची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल. ९९ टक्के भागधारकांनी प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केले, जे गुंतवणूकदारांचा विश्वास दर्शवतं. या हालचालीमुळे नजीकच्या भविष्यात कंपनीच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या निधीची संपूर्ण व्यवस्था सुनिश्चित होईल, असं ओला इलेक्ट्रिकनं म्हटलं.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :ओलाशेअर बाजारगुंतवणूक