Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 09:07 IST

Ola Stock Down Investors Loss: व्यवहारादरम्यान कंपनीचा स्टॉक ५.५ टक्क्यांनी घसरून ₹३१.११ च्या नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये सातत्यानं घसरण होत आहे.

Ola Stock Down Investors Loss: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या (Ola Electric Mobility) शेअर्सवर गुरुवारी पुन्हा एकदा विक्रीचा मोठा दबाव पाहायला मिळाला. व्यवहारादरम्यान कंपनीचा स्टॉक ५.५ टक्क्यांनी घसरून ₹३१.११ च्या नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये सातत्यानं घसरण होत असून, कंपनीचे संस्थापक आणि प्रवर्तक भाविश अग्रवाल यांनी आपला काही हिस्सा विकल्याची बातमी या घसरणीचं मुख्य कारण मानली जात आहे.

भाविश अग्रवाल यांनी सलग दोन ट्रेडिंग सेशन्समध्ये ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स विकले. त्यांनी बुधवारी ४.२ कोटी शेअर्सची विक्री केली, तर त्याआधी मंगळवारी २.६ कोटी शेअर्सची विक्री केली होती. प्रवर्तक स्तरावरील ₹२६० कोटींचं कर्ज पूर्णपणे फेडण्याच्या उद्देशाने ही विक्री केली जात असल्याचं कंपनीनं म्हटलंय. आतापर्यंत झालेल्या या दोन्ही व्यवहारांचं एकूण मूल्य सुमारे ₹२३४ कोटी रुपये आहे.

देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी घट

ओला इलेक्ट्रिकचा शेअर २६ डिसेंबर २०२४ रोजी ₹९९.९० या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर होता, तिथून तो आता सुमारे ७० टक्क्यांनी कोसळला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये आलेल्या आयपीओच्या ₹७६ या इश्यू प्राईसच्या तुलनेत हा स्टॉक सुमारे ६० टक्के खाली व्यवहार करत आहे. इतकंच नाही तर, लिस्टिंगनंतर ऑगस्ट २०२४ मध्ये गाठलेल्या ₹१५७ च्या 'ऑल टाइम हाय' पातळीपासून हा शेअर आतापर्यंत ८० टक्क्यांनी घसरला आहे.

या घसरणीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्येही मोठी घट झाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल ₹६९,२५० कोटींच्या सर्वोच्च स्तरावरून घसरून आता केवळ ₹१३,७२५ कोटींवर आलंय. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीतून ५५,५२० कोटी रुपयांहून अधिक मूल्य नष्ट झालं आहे. ३० सप्टेंबर २०२५ च्या आकडेवारीनुसार, १९.१४ लाखांहून अधिक किरकोळ गुंतवणूकदारांकडे कंपनीचा २५.२५ टक्के हिस्सा होता, ज्यांना या घसरणीचा मोठा फटका बसला आहे.

वाढती स्पर्धा आणि अंतर्गत दबाव

प्रवर्तकांकडून होत असलेल्या शेअर विक्रीव्यतिरिक्त, ओला इलेक्ट्रिकसमोर इतरही अनेक आव्हानं आहेत. हिरो, एथर, बजाज आणि टीव्हीएस मोटर यांसारख्या प्रस्थापित कंपन्यांकडून ओलाला मोठी स्पर्धा मिळत आहे. तसंच, कंपनीच्या सर्व्हिसबद्दल नकारात्मक बातम्या आणि विक्रीच्या घटत्या प्रमाणामुळे ओलाच्या बाजारपेठेतील हिस्स्यातही घट झाली आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, कंपनीचे व्यवस्थापन सध्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर व्यवसायाऐवजी बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग आणि बॅटरी सेल व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.

वाढतं कर्ज, कमकुवत रोख प्रवाह (Cash Flow) आणि कमकुवत फंडामेंटल्स ही कंपनीला पुन्हा उभारी मिळण्यातील मोठी अडथळे ठरत आहेत. इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रातील नफा आणि नजीकच्या भविष्यातील वाढीबाबत आता गुंतवणूकदार सावध झाले आहेत. बाजारातील आक्रमक किमतींमुळे मार्जिनवर दबाव वाढला आहे, तर दुसरीकडे वाढत्या ऑपरेटिंग खर्चामुळे नफ्याचे चित्र सध्या धूसर दिसत आहे. याच कारणांमुळे ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सवर सतत दबाव कायम आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Ola Investors Lose Billions as Stock Plummets 80% in Months

Web Summary : Ola Electric's stock crashed, wiping out over ₹55,550 crore of investor wealth. Shares fell 80% from their peak due to promoter stake sales and market competition. Weak fundamentals and focus shift add to the woes.
टॅग्स :ओलाशेअर बाजारगुंतवणूक