Join us

NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 13:43 IST

NTPC Green Energy IPO : एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ पुढील आठवड्यात खुला होणार आहे. कंपनीच्या आयपीओची साईज १०,००० कोटी रुपये आहे.

NTPC Green Energy IPO : एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ पुढील आठवड्यात खुला होणार आहे. कंपनीच्या आयपीओची साईज १०,००० कोटी रुपये आहे. कंपनीचा इश्यू पूर्णपणे फ्रेश शेअर्सवर आधारित असेल. कंपनी आयपीओच्या माध्यमातून ९२.५९ कोटी नवे शेअर्स जारी करेल. एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ २२ नोव्हेंबरपर्यंत खुला राहणार आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओचा प्राइस बँड १०२ ते १०८ रुपये निश्चित करण्यात आलाय.

२५ नोव्हेंबरला होऊ शकतं अलॉटमेंट

या आयपीओच्या एका लॉटमध्ये १०८ शेअर्सचा समावेश करण्यात आलाय. ज्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १४,९०४ रुपये गुंतवावे लागतील. एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना २५ नोव्हेंबर रोजी हे शेअर्स अलॉट होण्याची शक्यता आहे. तर २७ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात लिस्ट होण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांना मिळणार सूट

कंपनीच्या वतीनं आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका शेअरवर ५ रुपयांची सूट दिली जाणार आहे. एकूण आयपीओच्या किमान ७५ टक्के हिस्सा क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी राखीव असेल. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी जास्तीत जास्त १० टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात येणार आहे. कंपनीने नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी जास्तीत जास्त १५ टक्के राखीव ठेवला आहे. सध्या कंपनीत १०० टक्के हिस्सा एनटीपीसीचाच आहे.

ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?

ग्रे मार्केटमध्ये आयपीओची स्थिती चांगली नाही. इन्व्हेस्टर्स गेन्सच्या रिपोर्टनुसार, आयपीओ आज २.५० रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. एनटीपीसीचा कमाल जीएमपी २५ रुपये आहे. त्यानंतर त्यात सातत्यानं घसरण होत आहे. जीएमपी मध्ये घसरण होण्यामागे सध्याच्या बाजाराचा कल असल्याचं मानलं जात आहे. शेअर बाजारात गेल्या ६ दिवसात मोठी घसरण पाहायला मिळालीये. सेन्सेक्स आणि निफ्टी तब्बल १० ते १० टक्क्यांनी घसरले आहेत.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :सरकारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार