NSE Holiday List : भारतीय शेअर बाजार एनएसईनं नवीन वर्ष २०२५ च्या सुट्टीचं कॅलेंडर जाहीर केले आहे. वर्षभरात एकूण १४ दिवस बाजार बंद राहणार आहे. फेब्रुवारी, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये एक दिवस, तर मार्च आणि ऑगस्ट मध्ये दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. एप्रिल आणि ऑक्टोबर मध्ये तीन सुट्ट्या असतील.
२०२५ ची पहिली सुट्टी २६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या निमित्तानं असेल. प्रजासत्ताक दिन, रामनवमी, बकरी ईद आणि मोहरम या प्रमुख सणांना सुट्टी असली तरी शनिवार किंवा रविवारी येत असल्याने या दिवशी वेगळी सुट्टी दिली जाणार नाही. दर शनिवार आणि रविवारी एनएसईला सुट्टी असते म्हणजेच बाजार पूर्णपणे बंद असतो.
मार्च एप्रिलमध्ये कधी सुट्टी?
मार्चमध्ये दोन दिवस सुट्टी आहे. १४ मार्च रोजी होळी आणि ३१ मार्च रोजी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त शेअर बाजार बंद राहिल. तर एप्रिल महिन्यात तीन सुट्ट्या असतील. १० तारखेला महावीर जयंती, १४ तारखेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि १८ तारखेला गुड फ्रायडे या दिवशी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बंद राहणार आहे.
मे ते डिसेंबरपर्यंतच्या सुट्ट्या
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०२५ रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे. ऑगस्टमध्ये १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि २७ ऑगस्टला गणेश चतुर्थीसाठी शेअर बाजार बंद राहिल. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त, दिवाळीनिमित्त २२ ऑक्टोबरला शेअर बाजार बंद राहिल. २१ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ शेअर शेअर बाजाराकडून नंतर जाहीर केली जाईल. ५ नोव्हेंबरला गुरु नानक जयंती आणि २५ डिसेंबरला ख्रिसमससाठी मार्केट बंद असेल.