Join us

४४ वेळा कंपनीनं दिलाय डिविंडेंड, आता पुन्हा एकदा नफा वाटण्याची तयारी; तुमच्याकडे आहे का ‘हा’ स्वस्त स्टॉक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 11:56 IST

Dividend Stock: या सरकारी कंपनीनं ७ मार्च रोजी यासंदर्भातील माहिती दिली. शुक्रवारी पुन्हा एकदा कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.

Dividend Stock: सरकारी कंपनी एनएमडीसी (NMDC) लाभांश देण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक १७ मार्च रोजी होणार आहे. ज्यामध्ये अंतरिम लाभांशाचा निर्णय घेतला जाईल. या सरकारी कंपनीनं ७ मार्च रोजी यासंदर्भातील माहिती दिली. शुक्रवारी पुन्हा एकदा कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. एनएमडीसीचा शेअर काल बाजार बंद होताना ०.१९ टक्क्यांनी वधारून ६७.०७ रुपयांवर बंद झाला. एनएमडीसीच्या शेअर्समध्ये सलग पाचव्या दिवशी वाढ दिसून आली.

४४ वेळा लाभांश दिला आहे

२८ ऑगस्ट २०२३ पासून एनएमडीसीनं आपल्या गुंतवणूकदारांना ४४ वेळा लाभांश दिला आहे. गेल्या १२ महिन्यांत कंपनीनं प्रति शेअर १.५० रुपये लाभांश दिलाय. एक्सचेंजवर उपलब्ध माहितीनुसार, २७ डिसेंबर २०२४ रोजी कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस म्हणून ट्रेड झाले. त्यानंतर कंपनीनं पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर २ शेअर बोनस देण्यात आले.

कंपनीची आर्थिक स्थिती कशी?

डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १८९६.६६ कोटी रुपये होता. त्यात वार्षिक तुलनेत २९ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १४६९.७३ कोटी रुपये होता. कंपनीला महसुलाच्या आघाडीवरही चांगली बातमी मिळाली आहे. कंपनीच्या उत्पन्नात २१.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत एनएमडीसीचा एकूण महसूल ६५६७.८३ कोटी रुपये होता.

एकीकडे सेन्सेक्स निर्देशांकात यंदा आतापर्यंत ५ टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली आहे. तर हा पीएसयू शेअर १.६५ टक्के परतावा देण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र, वार्षिक आधारावर पोझिशनल गुंतवणूकदारांचे १५ टक्क्यांहून अधिक नुकसान झालंय. तर सेन्सेक्सनं ०.२९ टक्के सकारात्मक परतावा दिलाय.

(टीप- यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक