Mukesh Ambani Stock : शेअर बाजारात सध्या मोठ्या घडामोडी सुरू असताना, मुकेश अंबानींच्या रिलायन्स ग्रुपच्या एका शेअरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो शेअर म्हणजे आलोक इंडस्ट्रीज. आज या टेक्सटाईल कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, त्याची किंमत २५ रुपयांपेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाने अनेक कंपन्या चिंतेत असताना हा फायदा कंपनीला झाला आहे.
वाढीचं नेमकं कारण काय?सोमवारी, आलोक इंडस्ट्रीजचे शेअर्स १५.३० टक्क्यांनी वाढून २३.२० रुपयांवर पोहोचले. गेल्या सात महिन्यांमधील ही त्याची सर्वोच्च पातळी आहे. या तेजीमागे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक मोठा निर्णय आहे. ट्रम्प यांनी बांगलादेशवर ३६ टक्के नवीन शुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा केली आहे, जे १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होईल.
अमेरिकेच्या या पावलामुळे भारताच्या कापड उद्योगाला मोठी संधी मिळणार आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. बांगलादेशवरील हे मोठे कर लागल्यामुळे अमेरिकन खरेदीदार भारताकडे वळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भारताच्या कापड निर्यातीला मोठी चालना मिळेल.
बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला धक्काबांगलादेशची अर्थव्यवस्था कापड उत्पादनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या या घोषणेने बांगलादेशचा तणाव वाढला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी हे ३६ टक्के शुल्क कमी करण्याची घोषणा केली होती, पण आता त्यांनी आपला निर्णय बदलला आहे.
भारत-अमेरिका व्यापार करार लवकरच?दरम्यान, भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापाराबाबत दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वाटाघाटी आता अंतिम टप्प्यात आहेत. दोन्ही देशांमध्ये लवकरच व्यापार करार जाहीर होण्याची शक्यता आहे. या करारामुळे कापड उद्योगासह काही महत्त्वाच्या क्षेत्रांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.
वाचा - १.२५ लाख दररोज? पंतप्रधान मोदींच्या नावाने लाखो लुटण्याचा प्रयत्न, तुम्ही तर फसला नाहीत ना?
यापूर्वी, मे महिन्यात भारताने यूकेसोबत एक मुक्त व्यापार करार (FTA) केला होता, ज्याचं उद्दिष्ट २०४० पर्यंत द्विपक्षीय व्यापार ३४ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवणं आहे. या करारामुळेही भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला फायदा होईल अशी अपेक्षा आहे.