Mukesh Ambani Net Worth : मागील काही महिन्यात शेअर बाजारात प्रचंड चढउतार पाहायला मिळाले. यात सामान्य गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मात्र, यातून दिग्गज उद्योगपतीही सुटले नाहीत. मंगळवारी बीएसई सेन्सेक्स ७८,०१७ वर बंद झाला. पण व्यवहारादरम्यान तो ७७,७४५ अंकांवर घसरला. यामध्ये रिलायन्स आणि अदानी समूहाचे अनेक शेअर्स तोट्यासह बंद झाले. याचा परिणाम रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या नेटवर्थवरही झाला.
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी घटब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मंगळवारी १.४२ अब्ज डॉलर्सची (१२,१०० कोटी रुपये) घट झाली. त्यामुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती ९१.८ अब्ज डॉलरवर घसरली. अंबानींच्या संपत्तीत या वर्षात आतापर्यंत १.२० अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी सध्या जगातील १७ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
गौतम अदानी यांना १६,३०० कोटी रुपयांचे नुकसानअदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीतही मंगळवारी घट झाली. गौतम अदानी यांच्या संपत्तीत १.९१ अब्ज डॉलर्स किंवा १६,३०० कोटी रुपयांची घट झाली आहे. यामुळे त्यांची एकूण संपत्ती ७३ अब्ज इतकी कमी झाली आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीत या वर्षात आतापर्यंत ५.७१ अब्ज डॉलरची घट झाली आहे. गौतम अदानी सध्या जगातील २१ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीलाही बसला फटकागौतम अदानी यांच्यापेक्षा इलॉन मस्क यांनी यावर्षी जास्त पैसे गमावले आहेत. टेस्ला, स्पेसएक्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चे मालक इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती या वर्षात आतापर्यंत ८४.८ बिलियन डॉलर्सने घसरली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, इलॉन मस्क ३४८ अब्ज डॉलर्स संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
शेअर मार्केटमध्ये तेजीगेल्या ५ महिन्यांपासून शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीला अखेर ब्रेक लागला. अवघ्या ७ दिवसांत २०२५ वर्षातील सर्व कसर भरुन काढली. परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री बंद करुन खरेदी केल्याने अनेक क्षेत्रात चांगली वाढ झाली. मात्र, असे असतानाही मंगळवारी बाजार उघडल्यानंतर ७०० अंकांनी घसरल्याने अनेकांच्या हृदयाची धडधड वाढली. अखेर बाजार सपाद पातळीवर बंद झाला.