MRF Stock Price: देशातील सर्वात मोठी टायर उत्पादक कंपनी एमआरएफ लिमिटेडचे (MRF Ltd.) शेअर्स मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले. कंपनीचे शेअर्स आज ₹३,४६४ म्हणजेच २% नं वाढून ₹१,५६,२५० वर आले. हा त्यांच्या ५२ आठवड्यांचा नवीन उच्चांकही ठरला. या वाढीमागे एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनीनं स्टॉक एक्सचेंजला एक स्पष्टीकरण दिलंय, ज्यामध्ये चेन्नईच्या तिरुवोट्टियूर प्लांटमध्ये संपामुळे उत्पादन थांबल्याचा दावा फेटाळून लावला आहे.
कंपनीनं काय म्हटलं?
‘कारखान्याचे कामकाज काही प्रमाणात सुरू आहे, जिथे जे कामगार संप करत नाहीयेत, त्या ठिकाणी काम सुरू आहे. लवकरात लवकर सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी कंपनी आवश्यक पावलं उचलत आहे,’ असं कंपनीनं म्हटलं. एमआरएफनं स्पष्ट केले की, त्यांच्या काही कामगारांनी बेकायदेशीर संप सुरू केला आहे. हा संप प्रामुख्याने वार्षिक विमा प्रीमियमच्या आगाऊ पेमेंटच्या मुद्द्यावर आणि राष्ट्रीय अप्रेंटिस प्रमोशन योजना (NAPS), प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) आणि ‘नान मुदलवन’ योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या भरतीला विरोध करण्यामुळे आहे.
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
कंपनीने पुढे सांगितलं की, संपाचा परिणाम कंपनीच्या आर्थिक स्थितीवर इतका मोठा नाही की SEBI (LODR), २०१५ च्या रेग्युलेशन ३० अंतर्गत त्याची माहिती देणं अनिवार्य आहे. तरीही, कंपनीनं आश्वासन दिलंय की या संदर्भात कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाल्यास ते वेळोवेळी स्टॉक एक्सचेंजला कळवलं जाईल.
कंपनीचा व्यवसाय
एमआरएफ ही भारतातील सर्वात मोठ्या टायर उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे, ज्याचं मुख्यालय चेन्नई, तामिळनाडू येथे आहे. कंपनीनं रबर उत्पादनांनी सुरुवात केली होती आणि आज ती फक्त टायर उत्पादनापुरती मर्यादित नसून अनेक प्रकारचे रबर आणि औद्योगिक उत्पादनंही बनवते. एमआरएफच्या व्यवसायात प्रवासी कार, ट्रक-बस, हलकी व्यावसायिक वाहनं, दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी टायर्सचे उत्पादन प्रमुख आहे. याव्यतिरिक्त, कंपनी ट्यूब्स, प्रेट्रेड्स (जुने टायर्स पुन्हा वापरण्यायोग्य बनवणारे उपकरण), औद्योगिक कन्व्हेयर बेल्ट्स आणि विविध प्रकारची पेंट्स व कोटिंग्जचं उत्पादनही करते.
एमआरएफचा व्यवसाय खेळण्यांपर्यंतही विस्तारलेला आहे, जिथे ती फनस्कूल (Funskool) ब्रँड अंतर्गत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीत खेळणी बनवते. कंपनीचे भारतात अनेक उत्पादन प्रकल्प आहेत आणि ती आपल्या उत्पादनांची निर्यात विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही करते. ब्रँड व्हॅल्यू आणि विश्वासार्हतेच्या बाबतीतही एमआरएफ मजबूत स्थितीत आहे आणि तिला 'जगातील दुसऱ्या सर्वात मजबूत टायर ब्रँडमध्ये' गणले जाते.
(टीप- यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)