Join us

गुंतवणूकदारांची फसवणूक करत होती 'ही' कंपनी? SEBI ची कारवाई, ५०% आपटला शेअर, ₹८ वर आला भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:16 IST

Mishtann Foods Share Price : गेल्या तीन दिवसांपासून कंपनीच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. या काळात हा शेअर जवळपास ५० टक्क्यांनी घसरलाय.

Penny Stock SEBI Action: मिश्टान्न फूड्सचे (Mishtann Foods) शेअर्स सातत्यानं चर्चेत आहे. गेल्या तीन दिवसांपासून कंपनीच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. या काळात हा शेअर जवळपास ५० टक्क्यांनी घसरलाय. शुक्रवार, ६ डिसेंबर आणि सोमवार, ९ डिसेंबर या दोन्ही दिवशी हा शेअर २० टक्क्यांच्या लोअर सर्किटसह बंद झाला. कंपनीचा शेअर मंगळवारी १० टक्क्यांनी घसरून ८.९५ रुपयांवर आला. शेअर्सच्या या घसरणीमागे एक मोठं कारण आहे. दरम्यान,  बाजार नियामक सेबीनं (SEBI) कंपनीवर कडक कारवाई केली आहे.

काय आहे प्रकरण?

यापूर्वी बाजार नियामक सेबीनं समूहातील इतर कंपन्या आणि प्रवर्तकांच्या माध्यमातून सुमारे १०० कोटी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप केला असून कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याचबरोबर सेबीनं कंपनीला चुकीच्या पद्धतीनं वळवण्यात आलेल्याचं सांगत राइट्स इश्यूमधून जमा केलेले ४९.८२ कोटी रुपये परत आणण्याचे आदेश दिले. इतकंच नाही तर कंपनीला ७ वर्षांसाठी पब्लिक फंड गोळा करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

काय म्हटलंय सेबीनं?

सेबीच्या म्हणण्यानुसार मिश्टान्न फूड्सनं बनावट संस्था तयार करून खरेदी-विक्रीचे आकडे फुगवले होते. यातील अनेकजण कंपनीचे एमडी हितेशकुमार गौरीशंकर पटेल आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित होते. या शेल कंपन्यांचा वापर मिश्टान्न फूड्स आणि त्याच्या संलग्न कंपन्यांमध्ये निधी हस्तांतरित करण्यासाठी केला गेला, ज्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती बिघडली. मात्र, कंपनीनं सेबीकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले असून हे प्रश्न सोडवण्यासाठी आपली कायदेशीर टीम प्रयत्नशील असल्याचं म्हटलं आहे.

शेअर घसरला

मिश्टान्न फूड्सच्या शेअरची किंमत एका आठवड्यात ३०% पेक्षा जास्त आणि एका महिन्यात ३९% पेक्षा जास्त घसरली आहे. सहा महिन्यांत हा शेअर ४३ टक्क्यांनी घसरला असून तो YTD मध्ये ४५ टक्क्यांहून अधिक घसरलाय. कंपनीचं मार्केट कॅप ९६४.४६ कोटी रुपये होतं.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक