Join us

भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 11:02 IST

एमसीएक्सनं केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचा परिणाम त्यांच्या शेअर्सवर दिसून येत आहे. जाणून घ्या नक्की एमसीएक्सनं काय केलंय आणि त्याचा काय परिणाम होणार.

आज MCXच्या (मल्टी कमोडिटी एक्स्चेंज) शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. बीएसईवर या शेअरमध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ होऊन ७,८२० रुपयांचा नवा विक्रमी उच्चांक गाठला. कारण, एमसीएक्सला भारतात पहिल्यांदाच इलेक्ट्रिसिटी डेरिव्हेटिव्ह लाँच करण्याची परवानगी मिळाली आहे. भारताच्या वीज बाजारपेठेतील हे मोठं पाऊल आहे.

हे कसं काम करणार?

एमसीएक्सनं दिलेल्या माहितीनुसार, या नवीन उत्पादनामुळे वीज निर्मिती कंपन्या, वीज वितरक आणि मोठे वीज खरेदीदार (जसे की कारखाने) आता किंमतीतील चढउतारांपासून स्वतःचं संरक्षण करू शकतील. यामुळे विजेची बाजारपेठ अधिक मजबूत आणि कार्यक्षम होईल.

हेही वाचा : अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार

हे इतकं खास का आहे?

१. इंडियाज फर्स्ट : भारतात हे पहिल्यांदाच होत आहे.

२. इनोव्हेशनचं उदाहरण : एमसीएक्सनं नवीन कल्पना आणण्यात आघाडीवर असल्याचं सिद्ध केलंय.

३. हरित ऊर्जेला प्रोत्साहन : भारताचं क्लिन एनर्जी आणि 'विकसित भारता'चं स्वप्न साकार करण्यासाठी ही पावलं उपयुक्त आहेत.

"विजेच्या किमतींचं हे 'इलेक्ट्रिसिटी डेरिव्हेटिव्ह' भारताच्या व्यावसायिक बाजारपेठेसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे. रिन्यूएबल एनर्जी (सौर, पवन) आणि खुल्या वीज बाजारपेठेच्या युगात, ही उत्पादनं वास्तविक वीज बाजार (भौतिक) आणि वित्तीय बाजार यांच्यातील एक आवश्यक दुवा बनतील," अशी प्रतिक्रिया एमसीएक्सच्या सीईओ प्रवीणा राय यांनी दिली.

(टीप : यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक