संदीप वाळुंज,ग्रुप चीफ मार्केटिंग ऑफिसर,मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस
गेले काही आठवडे बाजार सतत दबावाखाली आहे — शेअर निर्देशांक डळमळीत आहेत, परदेशी गुंतवणूकदार (FPIs) मोठ्या प्रमाणावर शेअर्स विकत आहेत, कॉर्पोरेट कमाई व पी/ई गुणोत्तरे नरम होत आहेत, अमेरिकेची शुल्क धोरणाबाबतची भाषा अधिक भडक होत आहे आणि सोने-चांदी दोन्हींचे भाव झपाट्याने वाढत आहेत. जागतिक आर्थिक अस्थिरता आणि भूराजकीय तणाव यात भर घालत आहेत. या वातावरणात प्रश्न असा उद्भवतो: ऑक्टोबर महिन्यांत बाजाराचे चित्र पालटेल का?
१. कॉर्पोरेट कमाई व पी/ई नरमाई: गुंतवणूकीसाठी संधी?
गेल्या वर्षभरात भारताच्या कॉर्पोरेट कमाईतील वाढ मंदावली आहे आणि पी/ई गुणोत्तर कमी होत आहे, जे सूचित करते की गुंतवणूकदारांच्या जवळच्या काळातील परताव्याच्या अपेक्षा कमी झाल्या आहेत. ही गोष्ट गुंतवणूकदारांसाठी नक्कीच चांगली आहे. जेव्हा अपेक्षा कमी होतात, तेव्हा उच्च-गुणवत्ता असलेल्या कंपन्यांचे मुल्यांकन सामान्य पातळीवर असते आणि या मूल्यांकनावर खरेदी केलेल्या खरेदीदारांना मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकतो.
२. परदेशी गुंतवणूकदार: अल्पकालीन व्यापारी, दीर्घकालीन समर्थक नव्हेत
एफपीआय हे जागतिक तरलता व स्वतःच्या परफॉर्मन्स दडपणानुसार हालचाल करणारे संधीसाधू असतात; ते दीर्घकालीन धोरणात्मक गुंतवणूकदार नाहीत. २०२५ मध्ये आतापर्यंत त्यांनी सुमारे ₹१.१६–१.१७ लाख कोटी भारतीय इक्विटीतून काढले आहेत, हे भारतीय बाजाराच्या कामगिरीपेक्षा जागतिक व्याजदर चढउताराचे द्योतक आहे.
३. देशांतर्गत एसआयपी प्रवाहाचा मजबूत आधार
भारतीय किरकोळ व संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या सहभागामुळे एफपीआयने केलेल्या विक्रीतून निर्माण झालेल्या अस्थिरतेवर मात करणे शक्य झाले आहे. जुलै २०२५ मध्ये गुंतवणूकदारांनी एसआयपी माध्यमातून विक्रमी ₹२८,४६४ कोटी (फोलिओंची संख्या -९१.१ दशलक्ष) गुंतविले. ही गुंतवणूक बाजाराच्या स्थैर्यात खूप मोठी भूमिका बजावत आहे..
४. मान्सून, महागाई व ग्रामीण अर्थव्यवस्था
हवामान खात्याच्या अंदाजानुसार २०२५ मध्ये दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे १०६% पर्जन्यमान अपेक्षित आहे. शेतीचे उत्पन्न वाढल्यामुळे ग्रामीण क्रयशक्ती पुनर्जीवित होईल. पुरेशा कृषी उत्पादनामुळे अन्नधान्याच्या किमती कमी होऊन महागाई नियंत्रणात राहील. किरकोळ महागाई झपाट्याने कमी होतं आहे - जुलै २०२५ मध्ये सीपीआय १.५५% पर्यंत कमी झाला, परिणामी ऑगस्टच्या पतधोरण आढावा बैठकीत रेपोदरात अर्ध्या टक्क्याची कपात करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे तसेच जीएसटी दर कपातीमुळे ग्राहकांच्या हातात जास्त क्रयशक्ती राहील आणि RBI ला आक्रमक पावले उचलण्याची गरज नाही.
५. जागतिक पुनर्रचना: भारतासाठी संधी
अर्थकारणापलीकडे पाहता भू-राजकारणात भूकंपासारखे बदल घडत आहेत. भारताने एकाच वेळी अमेरिका, रशिया, चीन आणि इतर राष्ट्र गटांशी विविध पातळींवर बस्तान बसवायला नव्याने सुरवात केली आहे. तसेच जागतिक पुरवठा साखळीत एक विश्वासार्ह भागीदार म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. "चीन प्लस वन " पर्याय शोधणाऱ्या पाश्चात्य कंपन्या भारतात अधिक थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) करण्याचा विचार करीत आहेत. या जागतिक पुनर्रचनेमुळे पुढील दशकात देशात उत्पादन, निर्यात आणि भांडवली गुंतवणूक वाढू शकते.
६. रुपया व कॅपेक्स सायकल
रुपया ८७.८०–८८.२०/$ या पट्ट्यात बऱ्यापैकी स्थिर आहे; एकंदरीत विनिमय दरात सापेक्ष स्थैर्य असून अनेक वर्षांनंतर खाजगी भांडवली गुंतवणूक वाढेल अशी चिन्हे आहेत — गुंतवणूकदारांसाठी हा सकारात्मक संकेत आहे.
७. हिरवे कोंब दिसू लागलेत पण अजून नाजूक आहेत
शांघाय सहकार संघटनेच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी केलेले विधान — “भारत-चीनशी आता वसाहतकालीन भाषेत बोलता येणार नाही” — भारताच्या भू-राजकीय प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब करते. जीएसटी परिषदेची सुधारणात्मक पावले उत्पादन, उपभोग व रोजगाराला बळ देणारी आहेत. तरीसुद्धा महागाई घटली, मान्सून जोरदार आहे, कॅपेक्स वाढू लागला तरीही अपेक्षेइतका बाजार सुधारला नाही. यावरून स्पष्ट होते की हिरवे कोंब दिसू लागलेत, पण मुळे अजून घट्ट व्हायची आहेत.
८. गुंतवणुकीचा मंत्र: ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल'
जेव्हा सर्वकाही छान चाललेले असते तेव्हा नफा कमावणे सोपे नसते. परंतु जेव्हा निराशेचा अंधकार असतो आणि बाजार मोठ्या घसरणीला सामोरा जात असतो, तेव्हा योग्य गुंतवणूक करून चांगला ‘अल्फा’ बहुतेकदा कमावता येतो. सध्याचा परिप्रेक्ष्य हा संयमी व लवकर सुरुवात करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य काळ ठरू शकतो.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
साहसी गुंतवणूकदार (तुम्हाला अस्थिरता सहन करता येत असेल तर): वित्तीय, भांडवली खर्च/औद्योगिक उत्पादने, तंत्रज्ञान सेवा आणि अक्षय ऊर्जा-आधारित उद्योगांवर लक्ष केंद्रित करा. ‘स्टेप-अप SIP’ किंवा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करत राहा; तळ पकडण्याच्या प्रयत्नात वेळ वाया घालवू नका.
स्थैर्य हवे असल्यास: लार्ज-कॅप किंवा बाजारातील विस्तृत निर्देशांकाधारित (इंडेक्स) फंडांत गुंतवणूक करा, सोन्या/चांदीमध्ये ५-१०% गुंतवणूक ठेवा. आणि थोडी तरलता (रोख/डेट) राखून ठेवा जेणेकरून बाजार अजून खाली आला तर संधी घेता येईल.
निष्कर्ष:
बाजारातील तेजी सुरक्षित वाटली तरी बहुतेकदा कमी फायदेशीर असते. मंदीत बाजार गोंधळलेले असले तरी नफा कमाविण्याच्या संधी आहेत. मान्सून चांगला सुरू आहे, महागाई उतरली आहे, देशांतर्गत एसआयपी प्रवाह भक्कम आहेत, रुपया तग धरून आहे, कॅपेक्स हालचाल दाखवत आहे, जीएसटी सुधारणा उपभोगाला चालना देणार आहेत, आणि जागतिक भू-राजकारण भारताच्या बाजूने फिरताना दिसतेय. ऑक्टोबर मध्ये बाजार उसळी मारेल की नाही हे पहायचे आहे. पण हे लक्षात ठेवा: समभाग गुंतवणूक ही ५-१० वर्षांसाठी करायची असते ५-१० महिन्यांसाठी नाही. जे सैन्य शांततेत घाम गाळते त्या सैन्याचे लढाईत कमी रक्त वाहते. त्याप्रमाणे जे मंदीत खरेदी करतात तेच तेजीचा लाभ घेताना दिसतात. अस्थिरतेत शिस्तबद्ध गुंतवणूक करीत राहणे हा मोठा लाभ मिळवण्याचा राजमार्ग आहे.