Join us

Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 13:18 IST

Mamaearth Share Price: शेअरच्या किंमतीत २० टक्क्यांची घसरण होऊन त्याला लोअर सर्किट लागलं. यामुळे मामाअर्थच्या शेअरची किंमत आता ३२४ रुपयांच्या आयपीओच्या किमतीच्या खाली गेली आहे. काय आहे यामागचं कारण.

Mamaearth Share Price: मामाअर्थची मूळ कंपनी होन्सा कन्झ्युमरच्या शेअरमध्ये (Honasa Consumer Share Price) सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी घसरण झाली. शेअरच्या किंमतीत २० टक्क्यांची घसरण होऊन त्याला लोअर सर्किट लागलं. यामुळे मामाअर्थच्या शेअरची किंमत आता ३२४ रुपयांच्या आयपीओच्या किमतीच्या खाली गेली आहे. कंपनीनं सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. या निराशाजनक निकालानंतर या शेअरमध्ये घसरण झाली. होन्सा कन्झ्युमरला सप्टेंबर तिमाहीत तोटा झाला. गेल्या पाच तिमाहीत पहिल्यांदाच कंपनीला तोटा झाला आहे.

होन्सा कन्झ्युमरला सप्टेंबर तिमाहीत सुमारे १९ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत २९ कोटी रुपयांचा नफा झाला होता. एबिटडा स्तरावरही कंपनीला सुमारे ३०.७ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. कंपनीचा महसूलही सप्टेंबर तिमाहीत ७ टक्क्यांनी घसरून ४६२ कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ४९६ कोटी रुपये होता.

कंपनीच्या व्यवस्थापनानं आपल्या फ्लॅगशिप ब्रँड मामाअर्थच्या वाढीत घट होण्याबरोबरच इन्व्हेंटरीमध्ये घट झाल्याची कबुली दिली आणि येत्या तिमाहीत त्याला गती देण्यासाठी नवीन रणनीती आखण्याची आवश्यकता असल्याचंही म्हटलं.

ब्रोकरेजनं केलं टार्गेट कमी

खराब निकालानंतर बहुतांश ब्रोकरेज कंपन्यांनी कंपनीचं रेटिंग किंवा टार्गेट प्राइस कमी केलं आहे. विदेशी ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गननं होन्सा कन्झ्युमरच्या शेअर्सला 'अंडरवेट' रेटिंग दिलंय आणि त्याची टार्गेट प्राइस ३३० रुपयांपर्यंत कमी केली. कमी महसुली अंदाज आणि कमकुवत मार्जिन दृष्टीकोन लक्षात घेता ब्रोकरेजनं आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या कमाईच्या अंदाजात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे.

जेफरीजने होन्सा कन्झ्युमरवर 'बाय'ची शिफारस कायम ठेवली असली तरी त्याची टार्गेट प्राइस ४२५ रुपये प्रति शेअर केली आहे. इन्व्हेंटरीत घट आणि कंपनीचा तोटा निराशाजनक आहे. संस्थापकांनी दिलेले निवेदन ज्यात त्यांनी आपली रणनीती नव्यानं आखण्याचा उल्लेख केला आहे, यामुळे अनिश्चिततेत भर पडलीये. हे त्याहीपेक्षा चिंताजनक आहे, असं ब्रोकरेजचं म्हणणं आहे.

एमकेनं होनासा कन्झ्युमरचे रेटिंग 'बाय'वरून 'सेल' असं केलं असून त्याची टार्गेट प्राइसही ५० टक्क्यांनी कमी करून ६०० रुपयांवरून ३०० रुपये केली आहे. होन्सा कन्झ्युमरची दुसऱ्या तिमाहीतील कामगिरी कमकुवत आहे आणि पुढील वाटचाल अस्थिर असल्याचं म्हटलंय. एमकेनं २०२५-२७ या आर्थिक वर्षात 'कंझर्व्हेटिव्ह' पद्धतीने आपल्या कमाईचा अंदाज ३५ टक्क्यांनी कमी केला आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग