Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात घबराट, पण LIC ला 'आयटी'वर विश्वास! TCS-HCL मध्ये मोठी गुंतवणूक; 'या' क्षेत्रातून काढला पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:44 IST

LIC Investment : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय जीवन विमा महामंडळने आयटी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवली आहे. जेव्हा अनेक गुंतवणूकदार या समभागांपासून दूर जात आहेत, तेव्हा एलआयसीने हा धाडसी निर्णय घेतला आहे.

LIC Investment : आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या धास्तीने सध्या शेअर बाजारात आयटी क्षेत्रात विक्रीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे टीसीएसपासून इन्फोसिसपर्यंत अनेक कंपन्यांचे शेअर्स आपटले आहेत. असे असताना 'एलआयसी'ने मात्र या संधीचा फायदा उठवत प्रवाहाविरुद्ध खेळी खेळली आहे. एलआयसीने डिसेंबर तिमाहीत आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचे हजारो कोटींचे शेअर्स खरेदी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या एलआयसीच्या पोर्टफोलिओचे एकूण मूल्य १७.८३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून त्यात आयटीचा वाटा लक्षणीयरीत्या वाढला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

आयटी क्षेत्रावर लावला ३५ हजार कोटींचा डाव एआयमुळे आयटी कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम होईल या भीतीने अनेक शेअर्स ३० टक्क्यांपर्यंत घसरले होते. एलआयसीने याच घसरणीला 'संधी' मानले आहे. एलआयसीने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सुमारे ३,१३६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. तर एचसीएल टेकमध्ये २,२९३ कोटींची गुंतवणूक वाढवली, तर कोफोर्ज मधील आपला हिस्सा १ टक्क्यावरून थेट ४.६६ टक्क्यांवर नेला. यामुळे एलआयसीची आयटी क्षेत्रातील गुंतवणूक अवघ्या तीन महिन्यांत १.८२ लाख कोटींवरून २.१७ लाख कोटींवर पोहोचली आहे.

बँकिंग आणि उद्योगातून काढता पाय एकीकडे आयटीमध्ये खरेदी सुरू असताना, एलआयसीने बँकिंग आणि जड उद्योग क्षेत्रातील आपल्या हिश्श्यात कपात केली आहे. एलआयसीने स्टेट बँक ऑफ इंडियाचे ३,०८० कोटींचे शेअर्स विकले. एचडीएफसी बँक (१,५२८ कोटी) आणि बँक ऑफ बडोदा (१,१७३ कोटी) मध्येही विक्री केली. रिलायन्स इंडस्ट्रीज (२,३६७ कोटी), एल अँड टी (२,४४२ कोटी) आणि हिंदाल्को (२,३०७ कोटी) यांसारख्या मोठ्या शेअर्समधून एलआयसीने नफा वसुली केली आहे.

फार्मा आणि इतर क्षेत्रांत 'बुलिश' केवळ आयटीच नव्हे, तर औषध निर्मिती क्षेत्रातही एलआयसी सकारात्मक आहे. एलआयसीने सन फार्मामध्ये २,९४२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, जी टीसीएसनंतरची दुसरी मोठी खरेदी ठरली. कोल इंडिया, बजाज ऑटो, एनएमडीसी आणि व्होल्टास या कंपन्यांमध्येही हिस्सा वाढवण्यात आला आहे.

वाचा - सोन्या-चांदीची चमक ओसरली! सर्वोच्च स्तरावरून दरात मोठी घसरण; आता नफा कमावण्याची वेळ?

एलआयसीची रणनीतीबाजार तज्ज्ञांच्या मते, एलआयसीने ज्या कंपन्यांत गुंतवणूक वाढवली, त्या शेअर्सनी या तिमाहीत सरासरी केवळ ०.१४% परतावा दिला आहे. याचा अर्थ एलआयसी सध्याच्या घसरणीचा फायदा घेऊन दीर्घकालीन गुंतवणूक करत आहे. एआयचा धोका हा केवळ तात्पुरता दबाव आहे की कायमस्वरूपी बदल, यावर एलआयसीने 'तात्पुरता दबाव' असल्याचे मानून आपली पावले उचलली आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : LIC Bets on IT Amid Market Fears, Dumps Banking Stocks

Web Summary : Ignoring AI fears, LIC invested heavily in IT giants like TCS and HCL in Q4, increasing its IT portfolio while reducing stakes in banking and industrial sectors. LIC also increased investments in pharma and other sectors, seeing current dips as temporary.
टॅग्स :एलआयसीमाहिती तंत्रज्ञानगुंतवणूकआर्टिफिशिअल इंटेलिजन्स