Tata Capital IPO: या वर्षीचा बहुप्रतिक्षित टाटा कॅपिटलचा आयपीओ ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गच्या ताज्या रिपोर्टनुसार, सूत्रांनी सांगितलं की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) काही अतिरिक्त वेळ मिळाल्यानंतर टाटा ग्रुपच्या एनबीएफसी कंपनीनं ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात त्यांचा बहुप्रतिक्षित आयपीओ लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खास मानला जात आहे कारण टाटा ग्रुपच्या वित्तीय सेवेचा हा पहिला मोठा इश्यू असेल. बाजारातील तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की आरबीआयकडून ही परवानगी मिळाल्यानंतर टाटा कॅपिटल त्यांच्या विकास योजना आणि विस्तारासाठी मजबूत भांडवल उभारण्यास सक्षम असेल.
अधिक माहिती काय?
ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये पुढे म्हटलंय की ही संपूर्ण प्रक्रिया खाजगी आहे आणि कंपनी या आठवड्यापर्यंत त्यांचा आयपीओ रोड शो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. रिपोर्टनुसार, टाटा कॅपिटल लवकरच त्यांचा दुसरा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल करणार आहे. टाटा कॅपिटलचा बहुप्रतिक्षित आयपीओ कंपनीला आरबीआयकडून अंतिम मुदत वाढवण्याची मंजुरी मिळते की नाही यावर पूर्णपणे अवलंबून आहे. खरं तर, २०२२ मध्ये, आरबीआयनं टाटा कॅपिटलला 'अपर-लेयर एनबीएफसी' म्हणून वर्गीकृत केलं होतं, ज्यामुळे कंपनीला तीन वर्षांच्या आत अनिवार्यपणे लिस्ट करावं लागणार होतं. ही अंतिम मुदत सप्टेंबर २०२५ मध्ये संपत आहे. अशा परिस्थितीत, कंपनी आयपीओची तयारी अंतिम करण्यासाठी आरबीआयकडून अतिरिक्त वेळ मागू शकते.
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
मेगा फंडरेजची तयारी
हा आयपीओ भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठ्या आयपीओपैकी एक मानला जात आहे. कंपनी सुमारे ₹१७,००० कोटी (सुमारे २ बिलियन डॉलर्स) उभारण्याची अपेक्षा आहे आणि त्याचं मूल्यांकन सुमारे १८ बिलियन डॉलर्स मानलं जात आहे. आकाराच्या बाबतीत, हा आयपीओ भारतातील सर्वात मोठ्या आयपीओच्या यादीत समाविष्ट केला जाऊ शकतो, जिथे आतापर्यंत ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ सर्वात मोठा होता, त्यानंतर एलआयसी आणि पेटीएमचा क्रमांक लागतो.
अनलिस्टेड शेअर्सवर दबाव
आयपीओच्या तयारी आणि वाढत्या चर्चा दरम्यान, टाटा कॅपिटलच्या अनलिस्टेड शेअर्सवर दबाव आहे. एप्रिलमध्ये त्यांची किंमत ₹१,१२५ पर्यंत पोहोचली होती, परंतु आता ती सुमारे ₹७८५ पर्यंत घसरली आहे, म्हणजेच सुमारे ३०% घसरण झालीये. विश्लेषकांचा असा विश्वास आहे की आयपीओची किंमत कंपनीच्या राइट्स इश्यूच्या जवळ ठेवता येते, ज्यामुळे अनलिस्टेड शेअर्समध्ये आणखी घसरण होऊ शकते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)