Join us

टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 14:58 IST

Karnataka Bank Share Price: सोमवारी बाजार उघडताच खाजगी क्षेत्रातील बँकेचे शेअर्स जोरदार आपटले आणि २०० रुपयांच्या खाली आले.

Karnataka Bank Share Price: सोमवारी बाजार उघडताच खाजगी क्षेत्रातील कर्नाटक बँकेचे शेअर्स जोरदार आपटले आणि २०० रुपयांच्या खाली आले. सोमवारी बीएसईमध्ये कर्नाटक बँकेचे शेअर्स ७ टक्क्यांहून अधिक घसरले आणि १९२.७५ रुपयांवर व्यवहार करत होते. मंगळुरूमध्ये मुख्यालय असलेल्या कर्नाटक बँकेच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर झाली आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैयक्तिक कारणांमुळे त्यांच्या पदांवरून राजीनामा दिलाय.

वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा

कर्नाटक बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्रीकृष्णन हरी हरा सरमा आणि कार्यकारी संचालक शेखर राव यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला. कर्नाटक बँकेनं एका निवेदनात म्हटलं की सरमा यांचा राजीनामा या वर्षी १५ जुलैपासून लागू होईल. त्याच वेळी, कार्यकारी संचालक राव यांचा राजीनामा ३१ जुलै २०२५ पासून लागू होईल. व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्रीकृष्णन हरी हरा सरमा यांनी त्यांच्या पत्रात मुंबईला परत जाण्यासह वैयक्तिक कारण नमूद केली आहेत. त्याच वेळी, कार्यकारी संचालक राव यांनी त्यांच्या राजीनाम्यात इतर वैयक्तिक कारण नमूद केलीत, ज्यात मंगळुरूला स्थलांतरित होऊ न शकण्याचाही समावेश आहे.

Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी

सर्च कमिटीची स्थापना

व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नवीन कार्यकारी संचालक पदासाठी योग्य उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी एक शोध समिती स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय, बँकेने एका अनुभवी वरिष्ठ बँकरची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) म्हणून नियुक्ती केली आहे, जे २ जुलै रोजी पदभार स्वीकारतील, असं बँकेनं आपल्या निवेदनात म्हटलंय. दरम्यान, बँकेनं अद्याप त्यांचं नाव उघड केलेलं नाही. कर्नाटक बँकेच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी २४५ रुपये आहे. त्याच वेळी, बँकेच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १६२.२० रुपये आहे. गेल्या पाच वर्षांत, कर्नाटक बँकेच्या शेअर्समध्ये ३५५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तथापि, गेल्या एका वर्षात, बँकेचे शेअर्स १३ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकबँक