Join us

Jio IPO: जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 15:06 IST

Reliance AGM : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी जिओच्या आयपीओबाबत मोठी अपडेट दिली आहे.

Reliance Jio IPO: भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरणाऱ्या जिओबाबत मोठी बातमी समोर आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आज दुपारी २ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू झाली. सर्वात आधी कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी भागधारकांना संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी बहुप्रतीक्षित जिओच्या आयपीओबाबत मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, जिओचा आयपीओ २०२६ च्या पहिल्या सहामाहीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल.

मुकेश अंबानी यांनी सांगितले की, लवकरच यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था पूर्ण केली जाईल. ही घोषणा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक मोठा दिलासा मानली जात आहे, कारण गेले अनेक दिवस या आयपीओची चर्चा सुरू होती.

भारताला कोणीही थांबवू शकत नाहीएजीएममध्ये बोलताना मुकेश अंबानींनी भारताच्या प्रगतीवर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “भलेही भू-राजकीय अनिश्चितता कायम आहे, पण एक गोष्ट स्पष्ट आहे - भारत पुढे येत आहे आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही. भारत जगातील शीर्ष ४ अर्थव्यवस्थांमध्ये आधीच सामील झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची जीडीपी सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सर्वात वेगाने वाढत आहे.”

ते पुढे म्हणाले, “भारताला कोणत्याही विदेशी मॉडेलची कॉपी करण्याची गरज नाही. आपल्याकडे डीप टेक्नॉलॉजीचा वापर करून आपला 'इंडिया फर्स्ट मॉडेल' तयार करण्याची क्षमता आहे. यामुळे देशाची सुरक्षा मजबूत होईल, लोकांचे जीवनमान सुधारेल आणि पर्यावरणाचेही संरक्षण होईल.”

'इंडियन ड्रीम' साकारणारजागतिक अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, जग सध्या खोल अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात आहे, परंतु संघर्ष कोणालाही जिंकवून देत नाही, तर सहकार्य सर्वांसाठी समृद्धी सुनिश्चित करते.

वाचा - ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड

रिलायन्स आपल्या 'सुवर्ण दशका'च्या समाप्तीकडे वाटचाल करत असताना, आम्ही 'इंडियन ड्रीम' साकार करण्यासाठी स्वतःला समर्पित करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “आम्ही आमच्या प्रत्येक व्यवसायाला एआय-नेटिव्ह बनवत आहोत. तसेच, 'वी केअर' तत्त्वज्ञान वापरून लोकांचे आणि पर्यावरणाचे कल्याण सर्वात महत्त्वाचे मानत आहोत. नवकल्पना केंद्रस्थानी ठेवून, आम्ही नवीन पिढीच्या नेतृत्वाला सक्षम बनवत आहोत.”

टॅग्स :जिओइनिशिअल पब्लिक ऑफरिंगरिलायन्समुकेश अंबानीस्टॉक मार्केट