Allianz Jio Reinsurance Ltd : तुमच्या गाडीचा, घराचा किंवा आरोग्याचा विमा काढलाय? पण... विमा कंपन्यांनाही विम्याची गरज असते, हे तुम्हाला माहीत आहे का? जर अचानक एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती आली आणि हजारो लोकांना एकाचवेळी मोठा क्लेम भरावा लागला, तर विमा कंपनीलाही आर्थिक अडचणी येऊ शकतात. म्हणूनच, अशा मोठ्या जोखमीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विमा कंपन्या 'पुनर्बीमा' (Reinsurance) घेतात. आता याच 'पुनर्विमा' क्षेत्रात भारतातील जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि जर्मनीची मोठी कंपनी अलियान्झ (Allianz) यांनी एकत्र येऊन एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे.
जियो आणि अलियान्झची नवी कंपनीजियो फायनान्शियल सर्व्हिसेस आणि अलियान्झ यांनी मिळून 'अल्यान्झ जियो रीइन्श्युरन्स लिमिटेड' नावाची एक नवीन कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीत दोन्ही भागीदारांची प्रत्येकी ५०-५०% भागीदारी असेल. या नव्या कंपनीला 'इर्डा' (IRDAI) अर्थात भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे, या कंपनीची भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे ८ सप्टेंबर २०२५ रोजी अधिकृत नोंदणीही झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच अलियान्झने बजाज फिनसर्व्हसोबतची आपली जुनी भागीदारी संपुष्टात आणली होती.
दोन्ही कंपन्यांची ताकद एकत्रया नव्या व्यवसायात दोन्ही कंपन्या आपापल्या क्षेत्रातील कौशल्ये एकत्र आणणार आहेत. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसला भारतातील बाजारपेठेची आणि ग्राहकवर्गाची चांगली समज आहे, तसेच त्याचे डिजिटल नेटवर्कही खूप मजबूत आहे. दुसरीकडे, अलियान्झकडे जगभरातील विमा आणि पुनर्विम्याचा मोठा अनुभव आहे, विशेषतः जोखमीचे मूल्यांकन करण्यामध्ये त्यांना विशेष प्राविण्य आहे.
वाचा - नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
जिओ फायनान्शियलच्या शेअरची कामगिरीगेल्या काही दिवसांपासून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअरमध्ये किंचित घसरण दिसत आहे. आज हा शेअर १.१४% च्या घसरणीसह ३०७.५५ रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या १ महिन्यातही त्याने ६.१६% चा नकारात्मक परतावा दिला आहे. तरीही, गेल्या ६ महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या शेअरने तब्बल ४२.०६% चा चांगला परतावा दिला आहे, ज्यामुळे तो अजूनही गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचा केंद्र बनलेला आहे.