ITC Hotels Share Listing: एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज आयटीसी लिमिटेडच्या स्प्लिट झालेल्या हॉटेल व्यवसायाच्या आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स बुधवारी २९ जानेवारी रोजी शेअर बाजारात लिस्ट झाले. आयटीसी हॉटेल्स हे सिगारेट ते एफएमसीजी समूह आयटीसी लिमिटेडचे स्वतंत्र युनिट आहे. आयटीसी हॉटेल्स व्यवसायाचं डीमर्जर १ जानेवारीपासून अंमलात आलं आणि आयटीसी हॉटेल्स स्वतंत्रपणे लिस्ट झाली. एनएसईवर आयटीसी हॉटेल्सचा शेअर २६० रुपये आणि बीएसईवर २७० रुपयांवर होता. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग ३० टक्के डिस्काऊंटवर झाली.
लिस्टिंगसोबतच नुकसान
आयटीसी हॉटेल्सची मूळ कंपनी आयटीसी लिमिटेडपासून वेगळी झाल्यानंतर बुधवारी त्यांचे शेअर्स बाजारात लिस्ट झाले. बीएसईवर आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स ३०.३७ टक्क्यांच्या सवलतीसह २७० रुपयांच्या डिस्कव्हर्ड प्राईजच्या तुलनेत १८८ रुपये प्रति शेअर दराने लिस्ट झाले. तर एनएसईवर आयटीसी हॉटेल्सचा शेअर २६० रुपये प्रति शेअरच्या किंमतीच्या तुलनेत ३०.७७ टक्क्यांच्या डिस्काऊंटसह म्हणजे १८० रुपये प्रति शेअरवर लिस्ट झाला. लिस्टिंगसोबतच तो ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटवरही पोहोचला आणि बीएसईवर हा शेअर इंट्राडे नीचांकी पातळीवर १७८.६० रुपयांवर घसरला.
आयटीसी हॉटेल्सचा डिमर्जर रेश्यो १०:१ होता, याचा अर्थ विद्यमान आयटीसी भागधारकांना प्रत्येक १० आयटीसी शेअर्समागे १ आयटीसी हॉटेल्सचा शेअर मिळाला. मूळ आयटीसी लिमिटेडने नवीन युनिटमध्ये ४०% हिस्सा कायम ठेवला आणि उर्वरित ६०% भागधारकांना वितरित केलाय. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) कोलकाता खंडपीठाने १६ डिसेंबर २०२४ रोजी बिझनेस डिव्हिजन योजनेला मंजुरी दिली होती. आयटीसी हॉटेल्स ९० ठिकाणी १४० हून अधिक हॉटेल्स चालवते आणि त्याचे सहा वेगवेगळे ब्रँड आहेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)