Join us

सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:29 IST

Sebi New Rule: शेअर बाजारात व्यवहार करण्याबाबत सेबीचा नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू होईल. यामुळे, गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या प्रत्यक्ष मार्जिननुसार त्यांची स्थिती ठेवावी लागेल.

Sebi New Rule : तुम्ही जर शेअर बाजारात ट्रेडिंग करत असला तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बाजार नियामक सेबीने (SEBI) इंट्राडे डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगवर (F&O) नवीन पोझिशन मर्यादा लागू करण्याची घोषणा केली आहे. हा नवा नियम १ ऑक्टोबरपासून लागू होईल. यानुसार, सेबीने इंडेक्स ऑप्शन्ससाठी इंट्राडे नेट पोझिशनची मर्यादा १५०० कोटींवरून वाढवून प्रति युनिट ५,००० कोटी रुपये केली आहे. या निर्णयाचा उद्देश बाजाराची खोली आणि स्थिरता यांमध्ये संतुलन राखणे हा आहे.

आता नेट इंट्राडे पोझिशनची मर्यादा किती असेल?१ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात सेबीने म्हटले आहे की, डेरिव्हेटिव्ह्ज बाजारातील सर्वाधिक व्यवहार असलेल्या इंडेक्स ऑप्शन्समध्ये इंट्राडे गुंतवणुकीवर स्पष्ट मर्यादा लागू केल्या जातील. याची गणना लाँग आणि शॉर्ट ट्रेड्स समायोजित करून, नवीन फ्युचर्स-इक्विव्हॅलेंट फ्रेमवर्कच्या आधारे केली जाईल.

या फ्रेमवर्कनुसार, फ्युचर्स-इक्विव्हॅलेंटच्या आधारावर मोजल्या गेलेल्या एका ट्रेडरची नेट इंट्राडे पोझिशनची मर्यादा ५,००० कोटी रुपये असेल. या नव्या नियमामुळे कोणताही गुंतवणूकदार सेबीने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त पोझिशन घेऊ शकणार नाही. मात्र, एकूण (ग्रॉस) पोझिशनची मर्यादा १०,००० कोटी रुपयांवर कायम ठेवण्यात आली आहे. सेबीने मोठ्या सट्टेबाजीच्या व्यवहारांसाठी एक्सचेंजेसच्या देखरेख नियमांनाही अधिक कडक केले आहे.

यामुळे काय फायदा होईल?सेबीचे म्हणणे आहे की, काही गुंतवणूकदार गरजेपेक्षा जास्त लीव्हरेज (कर्ज) घेऊन मोठी पोझिशन घेतात. यामुळे बाजारात जोखीम वाढते आणि अस्थिरता निर्माण होते. आता नव्या नियमानुसार, ट्रेडर्सना त्यांच्याकडे असलेल्या वास्तविक भांडवल आणि मार्जिननुसारच पोझिशन तयार करावी लागेल. यामुळे बाजारात पारदर्शकता आणि स्थिरता वाढेल.

वाचा - सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?

याशिवाय, गरजेपेक्षा जास्त मर्यादेवर बंदी घातल्यामुळे गुंतवणूकदारांना ठरलेल्या मर्यादेतच इंट्राडे ट्रेडिंग करावे लागेल. याचाच अर्थ, आता ट्रेडर्स जास्त लीव्हरेज घेऊन मोठे व्यवहार करू शकणार नाहीत, ज्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी तोट्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल.

टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटनिर्देशांकनिफ्टीगुंतवणूक