Indusind Bank Share Price : आर्थिक गोंधळ, लागोपाठ राजीनामे यामुळे काही दिवसांपासून संकटात सापडलेली इंडसइंड बँक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आज, शेअर बाजारात इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली. बँकेने नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजीव आनंद यांची नियुक्ती केल्यानंतर गुंतवणूकदारांनी उत्साहात खरेदी सुरू केली. सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात बँकेचा शेअर ६ टक्क्यांपर्यंत वाढला होता.
शेअरमध्ये वाढ आणि मागील कामगिरीमंगळवारी इंडसइंड बँकेचा शेअर ८४८.७० रुपयांपर्यंत पोहोचला. सोमवारी तो ८०४.०५ रुपयांवर बंद झाला होता. सकाळी ११:२८ वाजता तो १.५२% च्या वाढीसह ८१६.२५ रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या काही काळापासून या बँकेच्या शेअर्सवर दबाव होता. गेल्या एका वर्षात यात ४१% आणि गेल्या ६ महिन्यांत २३% हून अधिक घट झाली होती, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आताची वाढ गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारी आहे.
कोण आहेत राजीव आनंद?राजीव आनंद हे बँकिंग क्षेत्रातील एक अनुभवी नाव आहे. यापूर्वी ते अॅक्सिस बँकेत उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत होते, जिथे त्यांनी घाऊक बँकिंगचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांना कॉर्पोरेट बँकिंग, रिटेल बँकिंग आणि धोरणात्मक वाढीचा मोठा अनुभव आहे. इंडसइंड बँक सध्या एका आव्हानात्मक टप्प्यातून जात असताना, त्यांचे नेतृत्व बँकेला नवीन दिशा देईल अशी अपेक्षा आहे.
वाचा - FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
नियुक्तीमागचे कारणया वर्षाच्या सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह्ज अकाउंटिंगशी संबंधित एक प्रकरण समोर आले होते. त्यानंतर मागील एमडी आणि सीईओ सुमंत कठपालिया यांनी एप्रिलमध्ये पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून बँकेचा कारभार वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती सांभाळत होती. आता राजीव आनंद यांच्या नियुक्तीमुळे बँकेला पुन्हा एकदा स्थिर नेतृत्व मिळाले आहे. आनंद यांना तीन वर्षांसाठी एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.