Join us

इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये भूकंप! २० टक्क्यांनी तोंडावर आपटला; आता काय आहे भाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 11:22 IST

indusind bank news : अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम मंगळवारी भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये २०% घसरण झाली.

indusind bank share price : डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून अमेरिकेची अवस्था 'मी तर बुडणार, पण सोबत तुम्हालाही घेऊन जाणार' अशी झाली आहे. टॅरिफ धोरण, आक्रमक भूमिका याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहे. अमेरिकी शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम मंगळवारी भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळले. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स उघडताच तो ४०० अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३० अंकांपेक्षा अधिक खाली आला. यामध्ये खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली.

खासगी क्षेत्रातील दिग्गज इंडसइंड बँकेला मंगळवारी मोठा झटका बसला आहे. इंडसइंड बँकेच्या शेअरची किंमत आजच्या व्यवहाराच्या सुरुवातीच्या तासांमध्ये २० टक्क्यांनी घसरली. स्टॉकवर लोअर सर्किट लावण्यात आले. मंगळवारी इंडसइंड बँकेचा समभाग २०.०१ टक्क्यांनी घसरून ७२०.३५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. बँकेच्या अंतर्गत आढाव्याने डिसेंबर २०२४ पर्यंत तिच्या निव्वळ संपत्तीवर सुमारे २.३५% च्या प्रतिकूल परिणामाचा अंदाज व्यक्त केला होता. स्टॉकमधील ही घसरण मार्च २०२० नंतरची सर्वाधिक होती.

शेअरचे डाउनग्रेडइंडसइंड बँकेच्या शेअर्सवर आज मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव आला. खासगी बँकेच्या डेरिव्हेटिव्ह्ज पोर्टफोलिओमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती झाल्यामुळे कमकुवत कमाईच्या दृष्टीकोनातून विश्लेषकांनी डाउनग्रेड केलं. बाजारातील विश्लेषकांनी बँकेतील सततच्या नकारात्मक घडामोडींमुळे आणि कर्जदात्याच्या विश्वासार्हतेला धक्का बसण्याची भीती व्यक्ती केली आहे. तसेच स्टॉक 'होल्ड' वरून 'रिड्यूस' वर खाली आणला आहे.

सेन्सेक्स कोसळलामंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात खूपच खराब झाली. बीएसई सेन्सेक्स ७४,११५.१७ च्या आधीच्या बंदच्या तुलनेत ७३,७४३.८८ वर उघडला आणि काही मिनिटांतच तो ४०० हून अधिक अंकांनी घसरला आणि ७३,६७२ च्या पातळीवर घसरला. दुसरीकडे, एनएसईचा निफ्टी निर्देशांक (एनएसई निफ्टी) देखील सेन्सेक्सच्या पावलावर चालताना दिसत आहे. सोमवारच्या २२,४६०.३० च्या बंदच्या तुलनेत ते २२,३४५.९५ वर उघडले आणि काही मिनिटांत १३० हून अधिक अंकांनी घसरून २२,३१४ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसले. 

टॅग्स :बँकिंग क्षेत्रशेअर बाजारशेअर बाजारअमेरिका