Stock Market Today: मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ट्रम्प टॅरिफच्या तणावानंतर आज, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. मागील दोन सत्रांमध्ये आयटी आणि टेक्सटाईल्ससारख्या क्षेत्रांमध्ये मोठे नुकसान झाले होते, पण आज बाजारात पुन्हा थोडी तेजी परतली आहे. बीएसई सेन्सेक्स सुरुवातीच्या सत्रात सुमारे १३० अंकांनी वाढला, तर एनएसईवर निफ्टी ५० सुद्धा २४,५५० च्या पातळीवर उघडला.
दोन दिवसांत मोठे नुकसानगेल्या दोन व्यापारी सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे सुमारे ९.६९ लाख कोटी रुपये बुडाले होते. २७ ऑगस्ट रोजी भारतावर ५० टक्के टॅरिफ दर लागू झाल्यापासून सेन्सेक्समध्ये सुमारे १,५५५ अंकांची मोठी घसरण झाली होती. रशियाकडून स्वस्त तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दंडात्मक कारवाई म्हणून २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला आहे. यापूर्वीच २५ टक्के मूळ टॅरिफ लागू असल्याने, भारतावरील एकूण टॅरिफ दर ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. या टॅरिफचा परिणाम रत्न व दागिने, पादत्राणे, चामड्याची उत्पादने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर झाला आहे.
वाचा - भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
बाजाराला कोणत्या सेक्टर्सचा सपोर्ट?मागील काही दिवसांत आयटी, टेक्सटाईल्स आणि रिअल्टीसारख्या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली होती. त्याचबरोबर बँकिंग आणि मेटलचे शेअर्सही दबावात होते. मात्र, आजच्या सुरुवातीच्या सत्रात एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये काही प्रमाणात खरेदी दिसून येत आहे, ज्यामुळे बाजाराला थोडा आधार मिळाला आहे. ही खरेदी टिकून राहिल्यास बाजाराला अधिक सावरण्यास मदत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.