Share Market Closing : गेल्या आठवड्यात जोरदार वाढ झाल्यानंतर सोमवारी घसरण झालेल्या भारतीय शेअर बाजाराने आज, मंगळवारी दमदार पुनरागमन केले. आज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी मोठी उसळी घेतली. मंगळवारी बीएसई सेन्सेक्स ५९४.९५ अंकांच्या (०.७३%) वाढीसह ८२,३८०.६९ अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, एनएसईचा निफ्टी ५० निर्देशांकही १६९.९० अंकांच्या (०.६८%) तेजीसह २५,२३९.१० अंकांवर स्थिरावला. कालच्या घसरणीमुळे निराश झालेल्या गुंतवणूकदारांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरली.
सेन्सेक्समधील २८, तर निफ्टीमधील ४२ शेअर्समध्ये वाढआज शेअर बाजारातील तेजी सर्वसमावेशक होती. सेन्सेक्समधील ३० पैकी २८ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या निशाण्यावर बंद झाले, तर केवळ २ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. त्याचप्रमाणे, निफ्टी ५० मधील ५० पैकी ४२ कंपन्यांचे शेअर्स वाढले आणि केवळ ८ शेअर्स लाल निशाण्यावर बंद झाले. आज सर्वाधिक वाढ कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये (२.६४%) झाली. तर, एशियन पेंट्स (-०.८७%) आणि बजाज फायनान्स (-०.६९%) यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
या ४ प्रमुख कारणांमुळे बाजारात तेजीआज शेअर बाजारात वाढ होण्यामागे अनेक जागतिक आणि देशांतर्गत घटक कारणीभूत ठरले.
- भारत-अमेरिका व्यापार कराराची आशा: अमेरिका आणि भारतामध्ये व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे असिस्टंट ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह ब्रेंडन लिंच आज दिल्लीत पोहोचले आहेत. या चर्चेतून व्यापार शुल्क कमी होण्याची शक्यता असल्याने बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
- अमेरिकेत व्याजदर कपातीची अपेक्षा: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक आजपासून सुरू होत आहे. या बैठकीत व्याजदरात किमान २५ बेसिस पॉईंटची कपात होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला.
- मजबूत जागतिक संकेत: मंगळवारी आशियाई शेअर बाजारही मजबूत होते. दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक हिरव्या निशाण्यावर बंद झाले. सोमवारी अमेरिकेचा शेअर बाजारही वाढीसह बंद झाला होता, ज्यामुळे आज जागतिक बाजारपेठांमध्ये सकारात्मकता दिसून आली.
- रुपयाची ताकद: अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराच्या आशेने भारतीय रुपया मंगळवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १२ पैशांनी मजबूत होऊन ८८.०४ वर पोहोचला. रुपयाच्या या मजबुतीमुळेही बाजाराला बळ मिळाले.