Join us

अवघ्या 5 दिवसांत कमावले ₹ 66000 कोटी; Reliance चे गुंतवणूकदार मालामाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 15:51 IST

India Share Market : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही काळापासून चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

India Share Market : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही काळापासून चढ-उतार पाहायला मिळत आहेत. पण, मागील आठवडा शेअर बाजारासाठी चांगला ठरला आहे. BSE सेन्सेक्स 1,134.48 अंकांनी किंवा 1.55 टक्क्यांनी वाढला, तर NSE निफ्टी 427.8 अंकांनी किंवा 1.93 टक्क्यांनी वधारला. या दरम्यान, सेन्सेक्समधील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी सात कंपन्यांनी 2.10 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला. रिलायन्स आणि टीसीएसच्या गुंतवणूकदारांनी सर्वाधिक कमाई केली.

शेअर्स वधारले, गुंतवणूकदार सुखावलेरिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांसाठी मागील आठवडा खास होता. केवळ गेल्या पाच व्यापार दिवसांत RIL स्टॉकमध्ये 5.28 टक्क्यांची मजबूत वाढ झाली आहे. यामुळे मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल (RIL MCap) 16,90,328.70 कोटी रुपयांपर्यंत वाढले. म्हणजेच, रिलायन्सच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांनी अवघ्या पाच दिवसांत 66,985.25 कोटी रुपयांची कमाई केली. 

टीसीएस पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर...देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा समूहासाठी मागचा आठवडा चांगलाच ठरला. मागील आठवड्यात गमावलेला मुकुट पुन्हा मिळवण्यात कंपनीला यश आले. एचडीएफसी बँकेने बाजार मूल्याच्या बाबतीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला मागे टाकले होते, परंतु गेल्या पाच व्यापार दिवसांत TCS ने त्यांच्या बाजार मूल्यात 46,094.44 कोटी रुपयांची भर घातली. यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 13,06,599.95 कोटी रुपयांवर पोहोचले. 

SBI पासून HUL चे हाल...जर आपण इतर कमाई करणाऱ्या कंपन्यांवर नजर टाकली तर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे एमकॅप 39,714.56 कोटी रुपयांनी वाढून 6,53,951.53 कोटी रुपये झाले, भारती एअरटेलचे एमकॅफ 35,276.3 कोटी रुपयांनी वाढून 9,30,269.97 कोटी रुपये झाले. याशिवाय, ITC चे मार्केट कॅप 11,425.77 कोटी रुपयांनी वाढून 5,05,293.34 कोटी रुपयांवर पोहोचले, तर ICICI बँकेचे MCap 7,939.13 कोटी रुपयांनी वाढून 8,57,743.03 कोटी रुपये आणि हिंदुस्तान युनिलिव्हर MCap 2,519 कोटी रुपयांनी वाढून 5,17,802.92 कोटी रुपये झाले.

नंबर 1 वर रिलायन्सचा दबदबासर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजने आपला दबदबा कायम राखला आहे.  बाजार मूल्याच्या बाबतीत यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एसबीआय, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी आहेत.

(टीप- शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसाय