Multibagger Stock: हिताची एनर्जीचा शेअर (Hitachi Energy Share) ३० जानेवारीच्या सुरुवातीच्या व्यवहारात २० टक्क्यांनी वधारून १२१५७.९५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्समधील या तेजीमागचं कारण म्हणजे डिसेंबर तिमाहीचे उत्कृष्ट निकाल. वास्तविक, बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात जवळपास ५ पटीनं वाढ झाली. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कंपनीचा वार्षिक नफा ४९८ टक्क्यांनी वाढून १३७.४ कोटी रुपये झाला आहे. तर मागील तिमाहीतील ५२.३ कोटी रुपयांच्या तुलनेत नफ्यात १६२.७ टक्क्यांनी वाढ झालीये.
अधिक माहिती काय आहे?
अनुकूल अंमलबजावणी आणि ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारल्यामुळे ऑक्टोबर-डिसेंबर २०२४ तिमाहीत महसूल वार्षिक आधारावर ३१ टक्क्यांनी वाढून १,६७२.४ कोटी रुपये झाला आहे. तिसऱ्या तिमाहीत एबिटडा १६८.९ कोटी रुपये होता. ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या कालावधीत कंपनीला ११,५९४.३ कोटी रुपयांची आतापर्यंतची सर्वाधिक तिमाही ऑर्डर मिळाली.
याचं सर्वात मोठं कारण म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र येथून रिन्युएबल ऊर्जेच्या ट्रान्सफरसाठी मिळालेली मोठी हायव्होल्टेज डायरेक्ट करंट (एचव्हीडीसी) ऑर्डर. याव्यतिरिक्त, पारेषण विभागाने (एचव्हीडीसी ऑर्डर वगळून) वीज गुणवत्ता आणि सबस्टेशन प्रकल्पांच्या योजनांमध्ये ऑर्डर बुकचा वेग वाढविला.
इतर प्रमुख योगदान क्षेत्रांमध्ये वाहतूक, उद्योग आणि डेटा केंद्रांचा समावेश आहे. एकवेळच्या मोठ्या एचव्हीडीसी ऑर्डर वगळता, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, कॅनडा, क्रोएशिया, अझरबैजान आणि इतर प्रदेशातून होणारी निर्यात आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीच्या एकूण ऑर्डरपैकी ४०% पेक्षा जास्त होती, ज्यात विजेची गुणवत्ता, सबस्टेशन्स आणि रिन्युएबल ऑर्डर येत होत्या.
कंपनीच्या शेअर्सची स्थिती
गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत या शेअरनं १४०० टक्के मल्टीबॅगर परतावा दिलाय. हिताची एनर्जी कव्हर करणाऱ्या सहा विश्लेषकांपैकी चार विश्लेषकांनी यावर 'बाय' रेटिंग दिलाय, तर दोन विश्लेषकाचं शेअरवर अनुक्रमे 'होल्ड' आणि 'सेल' रेटिंग दिलंय.
गुरुवारी हिताची एनर्जी इंडियाचा शेअर २० टक्क्यांनी वधारून १२,२७७.४ रुपयांवर पोहोचला आहे. गुरुवारी हा शेअर २० टक्क्यांनी वधारण्यापूर्वी आपल्या उच्चांकी पातळीपासून सुमारे ४० टक्क्यांनी घसरला होता. डिसेंबर तिमाहीपर्यंत कंपनीचे ७६,१२४ छोटे भागधारक किंवा व्यक्ती होत्या ज्यांचं नोंदणीकृत भागभांडवल २ लाख रुपयांपर्यंत होते. या भागधारकांचा कंपनीत ८.५५ टक्के हिस्सा आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)