Hazoor Multi Projects Ltd Stock Price: रिअल इस्टेट स्मॉलकॅप कंपनी हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअरमध्ये मंगळवारी तेजी पाहायला मिळाली. या शेअरमध्ये १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून तो ४४.०८ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. कामकाजादरम्यान कंपनीचे शेअर्स १.६९ टक्क्यांच्या वाढीसह ४३.९८ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. या तेजीचं कारण म्हणजे कंपनीनं बिझनेस अपडेट दिलंय.
कंपनीचे बिझनेस अपडेट
सोमवारी, १८ ऑगस्ट २०२५ रोजी, हजूर मल्टी प्रोजेक्ट्सनं सांगितलं की त्यांनी गॅमन इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बांधकाम (ईपीसी) व्यवसायाचा काही भाग खरेदी करण्यासाठी बाईंडिंग प्रस्ताव सादर केला आहे.
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
हजूर मल्टी प्रोजेक्ट्सने शेअर बाजाराला (बीएसई) दिलेल्या माहितीनुसार १३ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर गॅमन इंजिनीअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कर्जदारांना अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) व्यवसायाचा काही हिस्सा खरेदी करण्यासाठी अधिकृतपणे बाईंडिंग प्रस्ताव सादर केलाय. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर, आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणि ऑफर स्वीकारल्यानंतरच हा करार पुढे जाईल, असंही कंपनीनं म्हटलंय.
जीईसीपीएल ही सिविल इंजिनिअरिंग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक अनुभवी कंपनी आहे, ज्याचा वाहतूक, ऊर्जा आणि शहरी विकास यासारख्या क्षेत्रांमध्ये प्रकल्प राबविण्याचा मजबूत इतिहास आहे. सध्या रस्ते, रेल्वे, मेट्रो, वीज, सिंचन, बंदरे आणि सागरी कामे अशा क्षेत्रांतील ईपीसी प्रकल्पांवर काम सुरू आहे.
एफआयआयनं वाढवला हिस्सा
एफआयआयनेही या शेअरमध्ये आपला हिस्सा वाढवला आहे. ट्रेंडलाइननुसार, एफआयआयनं जून २०२५ तिमाहीत आपला हिस्सा १९.७२% वरून २१.९०% पर्यंत वाढवला आहे.
शेअर परफॉर्मन्स
गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये १४ टक्क्यांनी वाढ झाली असून, गेल्या ५ वर्षांत ३९ हजार ७६३ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ६३.९० रुपये आहे, तर शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३२ रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)